Dhule : जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शुटींग काढून व्हिडीओ केला व्हायरल | पुढारी

Dhule : जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शुटींग काढून व्हिडीओ केला व्हायरल

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला जंगलात नेऊऩ तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाच्या मित्राने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शुट करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला असून इतक्यावरच न थांबता तिच्याकडून खंडणीही मागण्यात आली. याप्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून तरुणाच्या साथीदारांसह त्याच्या आई वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री तालुक्यातील चिपलीपाडा येथील १७ वर्षीय मुलीला मावजीपाडा येथील धनराज दिलीप पवार याने लग्नाचे आमिष दाखविले होते. १० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या भेटीगाठी गेलेल्या युवतीला तरुण दहिवेल तसेच जांभोरा गावाच्या हद्दीतील जंगलात घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याच्यासोबत रोहित, (रा. पिंजारझाडी) आणि दीपक सन्या बागुल, (रा.बाभुळदे) हे देखील होते. कोणी बघू नये म्हणून रोहित याने पाळत ठेवली तर दीपक बागुल याने मोबाईलमध्ये पिडीतेवर होत असलेल्या अत्याचाराचे चित्रण केले. दरम्यान धनराजचा मित्र दीपक व त्याच्या मित्रांनी पीडितेचा काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा प्रकार समजताच पिडितीने आरोपींना जाब विचारला असता उलट तिलाच धमकावण्यात आले. तिच्याकडून १५ हजारांची खंडणी मागण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात धनराज याला त्याच्या आई-वडिलांनी पाठिशी घातले. म्हणून त्यांच्याविरुद्धही पीडितेने फिर्याद दिली.

फिर्याद दाखल होताच पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दीपक बागुल याला ताब्यात घेतले. तर अन्य संशयितांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी साक्री पोलिसांत पाच संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button