पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या संग्रामात विणकर समाजातील अनेकांचा मोठा वाटा असून, स्वातंत्र्यानंतर शासनाने विणकर्यांना मोठी मदत केल्याने हातमागाचा व्यवसाय तालुक्यात भरभराटीला आला होता. या व्यवसायाला गतवैभाव प्राप्त करून द्या, असे आवाहन पाथर्डीचे माजी सरपंच गजानन कोष्टी यांनी केले.
राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त चौंडेश्वरी देवी मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, मनीषा घुले, भारती असलकर, प्रा. गोवर्धन देखणे, संजय भागवत, प्रशांत शेळके, किशोर पारखे, निशिकांत कोष्टी, दीपक गोळख, उज्ज्वला सरोदे, सुवर्णा शिळवणे, अर्चना फासे, वंदना टेके, सुनीता उदबत्ते, मनीषा लाटणे, रामदास कांबळे, मंजुषा भंडारी, हरिभाऊ वाव्हळ, रुपाली भागवत, वर्षा गुरसाळी उपस्थित होते. या वेळी हातमागावर पैठणी तयार करणार्या महिलांचा गौरव करण्यात आला.
कोष्टी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या लढ्यात माजी आमदार स्व. माधवराव निर्हाळी व भाऊसाहेब सदावर्ते यांनी मोठी भूमिका बजावली होती. पाथर्डी शहरात एकेकाळी विणकर समाजाचे चारशेपेक्षा अधिक हातमाग होते. या ठिकाणी तयार झालेल्या साड्या संपूर्ण राज्यात विक्रीसाठी जात होत्या. काळाच्या ओघात हा व्यवसाय बंद झाला. मात्र, भारती असलकर व त्यांच्या सहकारी महिलांनी या व्यवसायाला पुन्हा तेजीत आणण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. महिलांनी राज्यात जशी येवल्याची पैठणी प्रसिद्ध आहे,, तशी पाथर्डी पैठणीचा नावलौकिक वाढवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा. गोवर्धन देखणे, सूत्रसंचालन भारती असलकर, तर आभार मंजुषा भंडारी यांनी मानले.