नाशिक(दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. मेरी येथील भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार तालुक्यात मंगळवारी (दि. 16) रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान तीन भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भितीचे वातावरण आहे.
मेरी येथील भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार रात्री 8.58, 9.34, आणि 9.42 असे तीन वेळा भुकंपाचे धक्के जाणवले. या तीन भुकंपाची तीव्रता अनुक्रमे 3.4, 2.1, 1.9 अशी होती. भुकंपाचं केंद्र नाशिक वेधशाळेपासून 16 ते 20 किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोणत्याही प्रकारची जीवितहानी यातून झालेली नाही. दरम्यान दिंडोरी तालुक्यातील जांबुटके गावात तर मंगळवारी सकाळपासूनच हे धक्के व काही स्फोटक आवाज येत होता असा दावा येथील स्थानिकांनी केला आहे. रात्री 9 च्या सुमारास अचानक घराला धक्का बसल्यासारखं जाणवलं. मात्र हे भूकंपाचे धक्के असल्याचे उशीरा लक्षात आले.
चाचडगाव, मडकीजांब, इंदोरे, राशेगाव या गावांना बसलेले धक्के इतके तीव्र होते की, अक्षरशः नागरिक उभे असताना खाली पडले. तसेच काहींच्या घरातील भांडेही पडल्याचे सांगितले जात आहे. दिंडोरी शहरापासून पश्चिम पट्ट्यात असलेल्या उमराळे गावाला अधिक तीव्र धक्के बसले असून प्रशासनाकडून नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.