नगर : भंडारदरा परिसरामध्ये पर्यटकांची उडाली झुंबड | पुढारी

नगर : भंडारदरा परिसरामध्ये पर्यटकांची उडाली झुंबड

अकोले, पुढारी वृत्तसेवा : 15 आँगस्ट स्वातंत्र्य दिवस अमृत महोत्सवी दिनानिमित्त सुटी असल्याने पुणे, नाशिक, ठाणे, नगर येथील 18 ते 20 हजार पर्यटकांनी भंडारदरा परिसरात हजेरी लावत निसर्गाच्या सान्निध्यात मनमुराद आनंद लुटला.

पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या व पावसाळ्यात बहरणार्‍या निसर्गामुळे घाटघर, भंडारदरा धरण ही ठिकाणी पर्यटकांची आकर्षण केंद्र बनली आहेत. अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखला जाते. कोकणकडा म्हणजे घाटकरना सौंदर्याचा मानबिंदू आहे. पावसाळ्यातील घाटघर, भंडारदर्‍याचे सौंदर्य अफलातून असते. हिरवे डोंगर, दुधाळ धबधबे, डोंगर माथ्यावर टेकणारे आभाळ, दरीतून वर झेपावणारे दाट धुक्याचे लोट, क्षणात लपेटून घेणारे दाट धुके, त्यांच्या सोबतीला झोंबणारा गार वारा, बेसुमार पाऊस हा सर्व निसर्ग सौदर्यांचा अविष्कार काही वेगळाच असतो.

या निसगरम्य वातावरणात मनमुराद आनंद लुटण्यासाठी ठाणे, अहमदनगर, मुंबई, पुणे, औरंगाबाद परिसातील पर्यटक आले होते. राजूरचे स.पो. नि.नरेंद्र साबळे, पो. कॉ.दिलिप डगळे, अशोक गाडे, विजय फटागंडे यांनी भंडारदरा परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहून पर्यटकांना आनंद लुटता यावा, म्हणून रंधा ते भंडारदरा मार्गावर प्रवेश बंदी करण्यात येऊन एकेरी वाहतूकीचा अवलंब केल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ठिकठिकाणी पोलिस पथक, स्वर्णसेवक, सुरक्षा दल नेमण्यात आले होते. यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या कुशित मनमुराद आनंद लुटता आला. वाहतूक सुरळीत सुरू होती.

मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणार्‍या तसेच भंडारदर्‍याकडे जाणार्‍या पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करत दारुच्या बाटल्या जप्त करुन पर्यटकासमोर दारू ओतली जात होती. त्यामुळे पोलिस कारवाईचा बडगा उचलताना दिसत होते. परंतु भंडारदरा धरण भरल्याने व मुसळधार पाऊस असल्याने पर्यटक दरवर्षीप्रमाणे आनंद लुटताना दिसत होते. तसेच भंडारदरा परिसरात पर्यटकांकडून , हाणामारीचे प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त व स्थानिक मुलांचा सहभाग नोंदवला होता, अशी माहिती राजूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिली.

रंधा फॉल येथे ही पर्यटकांनी मोठी हजेरी लावली होती, तसेच पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता जोर्वेकर, शाखा अभियंता अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस शिंदे, वसंत भालेराव, प्रकाश चव्हाण भंडारदरातील पाणी पातळीवर लक्ष ठेऊन आहेत.

Back to top button