नाशिक : हरिहर गडावर पर्यटकांना मिळणार सुरक्षा | पुढारी

नाशिक : हरिहर गडावर पर्यटकांना मिळणार सुरक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ऐतिहासिक हरिहर गडावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत याप्रश्नी लवकरच बैठक पार पडणार आहे. हरिहर गड सर करणार्‍या पर्यटकांसाठी आनंददायी बाब आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अभेद्य हरिहर गड हा चढाईसाठी अवघड असून, पावसाळ्यात तेथील सौंदर्य मनाला अधिकच भुरळ घालते. त्यामुळे नाशिकसह पुणे, मुंबई आणि राज्यभरातील पर्यटकांची पावले या गडाकडे वळत असून, दरवर्षी त्यांच्या संख्येत भर पडते आहे. मात्र, गडावर जाणारी वाट अवघड असून, काळ्या कातळातील पायर्‍या या धोकादायक आहेत. विशेषत: पावसाळ्यात पायर्‍यांवर शेवाळ साचत असल्याने छोटे-मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनीच पुढाकार घेत गडावर येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हरिहर गड हा पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभाग आणि अन्य संबंधित विभागांची एकत्रित बैठक आयोजित करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी वनविभागाला दिले आहेत. गडावर स्टील व इतर पक्के बांधकामासाठी परवानगी नसल्याने पायर्‍यांवर दोरखंड तसेच अन्य उपाययोजना राबविण्याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना भविष्यात हरिहर गड सर करणे अधिक सुकर होणार आहे.

दुगारवाडी धबधब्याजवळ जाण्यास बंदी : गेल्या आठवड्यात दुगारवाडी धबधबा येथे पर्यटक अडकल्याची तसेच पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत दरीत उतरून धबधब्याजवळ जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे पर्यटकांना दरीच्या वरील बाजूनेच धबधबा पाहता येईल.

हेही वाचा:

Back to top button