

मविप्र (तात्पर्य) : प्रताप म. जाधव
दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत खडाखडी सुरू ठेवावी, अशी स्थिती मराठा विद्या प्रसारक समाज अर्थात मविप्र (रूढ भाषेत एमव्हीपी) या अतिविशाल शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत सध्या पाहायला मिळते आहे. हे प्रतिस्पर्धी खरोखर तुल्यबळ आहेत की नाहीत, याचा निकाल या महिनाअखेरीस लागणार आहे. तोपर्यंत अंदाज बांधणे सुरू राहणार आहे. जिल्ह्यात मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. आता गेल्या काही दिवसांपासून त्याने झड लावली आहे; पण निसर्गाचे वर्तन कसेही असो, मविप्रच्या प्रचाराचे धुमशान मात्र सुरूच राहणार आहे.
विद्यमान सरचिटणीस नीलिमाताई पवार यांचे प्रगती पॅनल व त्यांना आव्हान देणारे माजी सभापती ॲड. नितीन ठाकरे यांचे परिवर्तन पॅनल यांचे झंझावाती दौरे जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहेत. एकमेकांचे वाभाडे काढणारी आक्रमक वक्तव्ये राेजच्या रोज केली जात असताना, जणू विजांचा कडकडाट होत असल्याचाच अनुभव गावागावात येत आहे. प्रचाराचे वादळ ठिकठिकाणचे पार, चावड्या, सभागृहे, लॉन्सवर जाऊन धडकत आहे. आपापल्या नेत्यांची प्रशंसा करताना समर्थकांच्या मुखातून कौतुकधारा बरसत आहेत. तसे पाहायला गेले, तर अद्याप निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झालेले नाही. इच्छुकांचे रूपांतर अद्याप उमेदवारांत झालेले नाही, तरीही अनेक जण आजच उमेदवार असल्यागत या निवडणुकोत्सवात सहभागी झाले आहेत. बहुतेकांचा उत्साह कायम आहे. अगदी १९ तारखेला अर्जांची माघार होईपर्यंतच्या काळातदेखील प्रचार उघडीप घ्यायला तयार नाही, असेच एकूण चित्र आहे.
पदाधिकारी आणि विविध संचालकपदांसाठी अनेक सभासद उमेदवार उभे ठाकणार असले, तरी लढत मुख्यत्वे पवार विरुद्ध ठाकरे अशीच होणार असल्याचे सांगण्यासाठी कोणा राजकीय पंडिताची गरज नाही. ही बाब एवढी स्पष्ट असताना, दोन्ही पॅनलचे उमेदवार मात्र अद्याप स्पष्टपणे पुढे आलेले नाहीत. सरचिटणीसपदासाठी श्रीमती पवार व ॲड. ठाकरे आणि परिवर्तन पॅनलकडून अध्यक्षपदासाठी आमदार माणिकराव कोकाटे हीच नावे निश्चित झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात येत आहे. कदाचित एकमेकांचे उमेदवार जाहीर होण्याचीही वाट पाहिली जात असावी. कुठलीही घाईगर्दी दोन्ही बाजूंकडून न हाेणे, ही गोष्टच संभाव्य चुरशीचे संकेत देणारी आहे. त्यात यंदा उपाध्यक्ष व महिला संचालक अशी दोन अतिरिक्त पदे वाढलेली असल्याने पॅनल नेमके कसे राहतील, याची सभासदांना मोठी उत्सुकता आहे.
हे झाले पॅनल आणि इच्छुक-उमेदवारांचे. आता थोडे सभासदांकडे वळू या. दहा हजार सभासद पुढील पाच वर्षे या संस्थेचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा, याचा निर्णय घेतात. संस्थेकडे निरपेक्ष भावनेने पाहात, कमालीचे शहाणपण दाखवत दर निवडणुकीत आपला कौल ते देत आलेले आहेत. आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांचा आढावा घेतला, तर याचा प्रत्यय आल्यावाचून राहात नाही. या सभासदांना त्यांचे वास्तव्य कोठेही असले, तरी आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊनच मतदान करावे लागते. अलीकडच्या काळात वाढलेले शहरीकरण, स्थलांतराचे प्रमाण यामुळे अनेक सभासद मूळ गाव साेडून अन्य ठिकाणी राहात आहेत. मतदानासाठी तालुक्याला जाणे त्यांना फारसे कठीण नसले, तरी त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी मतदान करता आले, तर त्यांची ना असणार नाही. सध्या ऑनलाइनचे युग आहे. सर्व प्रकारची तांत्रिक खबरदारी घेऊन अन्य तालुक्यात मतदान करता येणे शक्य आहे का, याचा विचार व्हावा. यावेळेच्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झालेली असल्याने, आता ते कदाचित शक्य होणार नाही; परंतु पुढील निवडणुकीत अशी काही व्यवस्था करता येईल का, या दिशेने वाटचाल करणे अगदीच अशक्य नाही.