नाशिक : तिसर्‍या सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल | पुढारी

नाशिक : तिसर्‍या सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे फेरीसाठी जाणार्‍या भाविकांना जुने सीबीएस येथून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची वर्दळ राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहर पोलिसांनी सीबीएस ते शरणपूर रोडकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे भाविकांमध्ये त्र्यंबकेश्वर येथे दर्शनास जाण्याची रीघ वाढली आहे. त्यातच तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांची गर्दी सर्वाधिक असल्याने त्या भाविकांना जुने सीबीएस येथून बसची व्यवस्था केली आहे. रविवारी (दि.14) सायंकाळनंतर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.

रविवारी (दि.14) दुपारी दोन ते सोमवारी (दि.15) रात्री आठपर्यंत सीबीएस ते शरणपूर रोड हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शरणपूर रोडवरून सिग्नलकडे एसटी व शहर बसेस वगळता इतर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालक सीबीएस येथून टिळकवाडी सिग्नल, मोडक सिग्नल, हॉटेल राजदूत मार्गे किंवा सीबीएसवरून मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ मार्गे गंगापूर रोडवरून इतरत्र जातील. टिळकवाडी सिग्नलकडून सीबीएसच्या दिशेने जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नलकडून जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नलवरून सीबीएच्या दिशेने जाईल किंवा टिळकवाडी सिग्नलवरून पंडित कॉलनी मार्गे गंगापूर रोडवरून अशोकस्तंभ मार्गे इतरत्र जाईल. हे निर्बंध पोलिस, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत, असे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी अधिसूचनेत म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button