नाशिक : ‘हँड-फुट-माउथ’चा वाढतोय संसर्ग; हात-पाय-तोंडाला होणारा विषाणूजन्य संसर्ग | पुढारी

नाशिक : ‘हँड-फुट-माउथ’चा वाढतोय संसर्ग; हात-पाय-तोंडाला होणारा विषाणूजन्य संसर्ग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला (हँड-फुट-माउथ) होणार्‍या विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण राज्यात सध्या वाढले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये येणार्‍या रुग्णांपैकी 8 ते 10 टक्के मुलांना हा आजार असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. शाळांमध्ये एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा आजार वाढत असून, घाबरून जाण्याचे कारण नाही. यात मुले सहा ते सात दिवसांत बरी होतात, असे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.

‘हँड-फुट-माउथ’ हा विषाणूजन्य संसर्ग आहे. या आजारामध्ये मुलांना सुरुवातीला ताप येतो. तसेच हात, पायाचा तळवा आणि तोंडामध्ये पुरळ येतेे. पावसाळ्यात ज्याप्रमाणे विषाणूजन्य संसर्गाची बाधा होऊन ताप, सर्दी, खोकला होतो त्याचप्रमाणे हा संसर्गदेखील पावसाळ्यात उद्भवतो. ‘हँड-फुट-माउथ’ या विषाणूजन्य आजारांची लागण झालेल्या बालकांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. या आजाराचे प्रमाण वाढले असले, तरी हा संसर्गजन्य आजार फारसा तीव्र नाही. या आजारात सहा ते सात दिवसांमध्ये मुले बरी होत असल्याचे आढळले आहे. सहा वर्षांपेक्षा कमी वयोगटाच्या मुलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलजा माने यांनी दिली. ‘हँड-फुट-माउथ’ या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी निश्चितच वाढले आहे. या आजाराशी काही प्रमाणात साधर्म्य असलेल्या कांजण्या आजारात पूर्ण अंगावर पुरळ येते; तर मंकीपॉक्स या आजारात मोठे फोड येतात. ‘हँड-फुट-माउथ’ या आजारात मुलांना फारसा त्रास होत नाही. परंतु, काही बालकांना तोंडामध्ये पुरळ आल्याने खाण्याची इच्छा नसते. बालकांना जेवण जात नाही. त्यामुळे अशक्तपणा येतो. शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होते. मात्र, तरीही धोकादायक अशी लक्षणे अजून तरी कोणत्याही बालकामध्ये आढळलेली नाहीत. मागील दोन वर्षांमध्ये मुले शाळेत गेली नव्हती. परंतु, आता शाळा सुरू झालेल्या असल्यामुळे याचा संसर्ग मुलांमध्ये जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळेदेखील प्रमाण वाढले असण्याची शक्यता आहे.

8-10% मुलांमध्ये ही लक्षणे आढळतात. तर 6-7 दिवसांत आजार कमी होतो.

आजाराची लक्षणे अशी: तळपाय, तळहात, कोपर, गुडघा आदी ठिकाणी पुरळ येतात. तोंडामध्येही पुरळ येतात. या आजारात मुलांना ताप येतो.

काय काळजी घ्याल? : जी मुले निरोगी आहेत, त्यांना शाळेतून आल्यावर स्वच्छ पाण्याने हात-पाय धुण्यास सांगावे. ज्यांना आजार झाला आहे, त्यांना बरे वाटेपर्यंत शाळेत पाठवू नये. पुरळामुळे खाज येत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने मलम वापरावे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेली औषधे द्यावीत. मुलांना पुरेशी विश्रांती घेऊ द्यावी.

आहार : तोंडामध्ये पुरळ आल्याने मुलांना खाता येत नाही. अशावेळी त्यांना पातळ पदार्थ किंवा जास्त चावावे लागणार नाही, असे हलके पदार्थ द्यावेत. पौष्टिक आहार द्यावा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ देऊ नयेत.

तज्ज्ञ काय म्हणतात…  या आजारामध्ये सुरुवातीला ताप येतो. हात, पायाचा तळवा आणि तोंडामध्ये पुरळ येतात. या आजारात मुले सहा ते सात दिवसांत बरे होत आहेत, घाबरून जाऊ नये. मुलांना पातळ आणि पौष्टिक आहार द्यायला हवा. – डॉ. शैलजा माने, बालरोगतज्ज्ञ.

कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. शाळा सुरू झाल्यावर हँड-फुट-माउथ या आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे. मुलांचे प्रमाण वाढत असली, तरी बर्‍या होणार्‍या मुलांचे प्रमाणही तितकेच आहे. मुलांचे आरोग्य सांभाळण्याची गरज आहे. – डॉ. अमर तोष्णीवाल, बालरोगतज्ज्ञ.

हेही वाचा :

Back to top button