नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ना. गिरीश महाजनांनाच! | पुढारी

नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ना. गिरीश महाजनांनाच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्य दिनी नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मिळाल्याचे आदेश गुरुवारी (दि.11) रात्री राज्य शासनाने काढले असून, त्यामुळे पालकमंत्रिपदही त्यांनाच मिळणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने राज्याच्या सत्तेवर आलेल्या भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या सत्तास्थापनेच्या तब्बल एक महिन्यानंतर मंगळवारी (दि. 9) करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात 18 मंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, विजयकुमार गावित, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील या उत्तर महाराष्ट्रातील पाच आमदारांना कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे देण्यात आली आहेत. यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नाशिकचे पालकमंत्रिपद कुणाकडे जाणार, याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर आहे. आगामी नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकटमोचक म्हणून माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे महाजन यांच्याच हाती नाशिकची सूत्रे दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होईल, असा सवालही उपस्थित केला जात होता.

त्यातच गुरुवारी रात्री राज्य शासनाने आदेश काढत ध्वजारोहण गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असल्याचे स्पष्ट केले. यावरून महाजन यांच्याकडेच नाशिकचे पालकमंत्री दिले जाण्याचे निश्चित मानले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button