जळगाव : ‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार; धावणार १०० ई-बस | पुढारी

जळगाव : ‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार; धावणार १०० ई-बस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार असून, राज्‍य परिवहन महामंडळाने ई– बस ही संकल्‍पना सुरू केली आहे. यातून प्रत्‍येक विभागासाठी या बसेस उपलब्‍ध करून देण्यात येणार आहेत. त्‍यानुसार जळगाव विभागासाठी १०० ई– बसचा प्रस्‍ताव आहे. डिझेलच्या बसेस जाऊन १०० नव्या ई-बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच दाखल होणार असल्याची माहिती जळगाव राज्य परिवहन विभागाने दिली.

जिल्ह्यात एसटी परिवहन विभागातील ११ आगारांत सुमारे ८०० हून अधिक बसेस प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. जुन्या बसेसच्या दुरवस्थेमुळे इंजिनच्या वारंवार दुरुस्तीच्या घटनांमुळे प्रवाशांना ऐन प्रवासादरम्यान त्रास सहन करून दुसऱ्या पर्यायी वाहनाचा शोध घ्यावा लागत होता. मात्र, आत नव्या बसेस इलेक्ट्रिक चार्जिंगयुक्त असल्याने अनेक समस्यांचे निरसन होणार आहे.

बसभाड्यात मिळणार सुविधा

एसटीच्या ७५ व्या वर्धापनदिनी १ जूनपासून राज्यातील प्रमुख महानगरात इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महामंडळ प्रशासनाने जिल्ह्याच्या व्याप्तीनुसार बसेस देण्याचे धोरण आहे. त्यानुसार जिल्हा परिवहन विभागाकडून ४९ बसेसची मागणी करण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आली असून, १०० ई-बसेस मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निमआराम बसच्या प्रवासी भाड्यानुसार या ई-बसेससाठी प्रवासी भाडे आकारणी होईल. या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी, सुखकारक प्रवास सुविधा मिळणार आहे.

हेही वाचा:

Back to top button