पुणे : भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो | पुढारी

पुणे : भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो

भामा आसखेड, पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्याद्वारे ६२० क्यूसेकने पाणी विसर्ग धरणाखालील भामा नदीपात्रात सुरू केल्याची माहिती भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तुळशीदास आंधळे यांनी दिली. धरणातून पाणी सोडल्याने सावधानतेचा इशारा म्हणून धरणाखालील आणि विशेषतः भामा नदी काठालागत गावे असलेल्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन धरण प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील अनेक धरणे १०० टक्के भरल्याने भामा आसखेड धरण कधी भरणार अशी उत्सुकता लागून होती. अखेर बुधवारी (दि.१०) दुपारी २ वाजता धरणात १०० टक्के साठा झाला. धरण ओव्हरफ्लो होताच प्रशासनाने धरणाचे सांडव्यावरील चारही गेट वर उचलून त्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन ६२० क्यूसेकने धरणातून पाणी विसर्ग सुरू केला. यावेळी धरणाचे अधिकारी तुळशीदास आंधळे व शाखा अभियंता निलेश घारे उपस्थित होते.

तालुक्याच्या पश्चिम भागात करंजविहीरे येथे भामा नदीवर ८.१४ टीएमसी पाणीसाठा क्षमतेचा भामा आसखेड धरण प्रकल्प आहे. हा प्रकल्प खेड, शिरूर, दौड, हवेली या चार तालुक्यांना शेतीसह पिण्याचे पाणी योजना तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहराला पिण्याचे पाण्यासाठी वरदान ठरला आहे. त्यामुळे भामा आसखेड धरण १०० टक्के भरणे अतिशय महत्वाचे होते.अखेर धरणात ८.१४ टीएमसी पाणीसाठा झाला.

सध्या धरणातील पाण्याची पातळी ६७१.५० मीटर असून एकूण पाणीसाठा २३०.६४७ दलघमी झाला. धरणाचा उपयुक्त पाणीसाठा २१७.१२५ दलघमी आहे. १ जूनपासून आतापर्यंत ६७९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद धरण प्रशासनाकडे झाली आहे.
धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले तर सांडव्याद्वारे पाणी विसर्ग वाढविला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठी गावातील नागरिकांनी नदीपात्रात कोणीही जाऊ नये. भामा व भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदी काठावर असणारे कृषी विदूयतपपं, शेतीचे अवजारे व इतर साहित्य सुरक्षितस्थळी हलवावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

Back to top button