नाशिक : नसानसांत भिनला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव | पुढारी

नाशिक : नसानसांत भिनला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

नाशिक : अंजली राऊत-भगत

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांमार्फत विविध स्पर्धा व उपक्रमांतून यंदाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनीही यानिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीवर नागरिकांसाठी विशेष सवलत योजना आणल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनी प्रथमच मोठी आर्थिक उलाढाल होणार असून, बाजारपेठेतही देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव प्रत्येक भारतीयामध्ये नसानसांत भिनलेला पाहायला मिळत आहे.

यंदाचा स्वातंत्र्य दिन महाराष्ट्र शासनस्तरावर सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये विशेषतः पहिल्यांदाच ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत प्रत्येक भारतीयाच्या घरावर डौलाने तिरंगा फडकणार आहे. ठिकठिकाणी निबंध, घोषवाक्य, चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, काव्य, मैदानी खेळ, सामूहिक गीत गायन, देशभक्तीपर गीत आदी स्पर्धा रंगणार आहेत. त्यानिमित्त शहरातील बाजारपेठेत सैनिकी पोशाख, भारतीय पोशाख विक्रीसाठी आले आहेत. प्रथमच टी शर्टवरही तिरंगा दिसून येत आहे. त्यामुळे अशा आगळ्यावेगळ्या पोशाखाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच, व्यावसायिकांनीही विविध वस्तूंवर विशेष सवलती दिल्या असून, रक्षाबंधनपासून ते १५ ऑगस्टपर्यंत या सवलतींचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. एकूणच, महागाईच्या काळात ग्राहकांना अशा सवलतींचा उपयोग होणार आहे.

स्वातंत्र्य दिन तर दरवर्षीच आनंदाने साजरा केला जातो. परंतु, यंदा अमृत महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांना प्राधान्य दिले जात असून, नागरिकांना बंपर बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. मोठ्या प्रमाणात सवलतींचा लाभ घेता येणार असल्याने सोशल मीडियावरही विविध कंपन्यांकडून दिल्या जाणार्‍या सवलतींकडे ग्राहकवर्ग ऑनलाइन सर्चिंगमध्ये आकर्षित होताना दिसून येत आहे. प्रथमच स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढणार आहे. – सचिन व्यवहारे, व्यापारी, नाशिक.

हेही वाचा:

Back to top button