नाशिक : पुढची प्रत्येक लढाई जिंकायची आहे : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे | पुढारी

नाशिक : पुढची प्रत्येक लढाई जिंकायची आहे : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शिवसैनिकांवर माझा विश्वास असून येथून पुढची प्रत्येक लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि ते ही मर्दासारखी, असे म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टिकास्त्र सोडले. प्रतिज्ञापत्र एवढी झाली पाहिजे की, भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे असे ठणकावत शिवसेनेचा भगवा कुणालाही हिसकावू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या खासदारांपासून ते पदाधिकार्‍यांपर्यंत अनेकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पक्ष अडचणीत असतानाच आता सिन्नरमध्ये मात्र दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू तथा सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे तसेच सोनांबे येथील सरपंच डॉ. रवींद्र पवार यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समर्थकांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.8) ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना ते बोलत होते. एकीकडे सदस्य नोंदणीला वाढता प्रतिसाद आणि दुसरीकडे पक्षामध्ये होत असलेले प्रवेश यामुळे शिवसेनेची तर ताकद वाढणार आहेच पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वासही वाढत असल्याचे कोकाटे यांच्या प्रवेशाने दिसून आले. यावेळी खासदार अरविंद सावंत, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी मंत्री बबनराव घोलप, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती नामदेव शिंदे, अरुण वाघ, नीलेश केदार, आप्पा पवार, नंदू वाजे, चंद्रकांत वाजे, कैलास वाजे, मोहन डावरे, ठाणगाव सोसायटीचे चेअरमन अमित पानसरे, विश्राम शेळके, रामनाथ शिंदे, प्रकाश तुपे, नवनाथ डावरे, योगेश पवार, तानाजी पवार, विकास पवार, दशरथ रोडे, प्रकाश पांगारकर, नाजगड, श्याम कासार, प्रशांत कुलकर्णी आदींसह पूर्व भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

‘कोकाटेंच्या शिवबंधनाची गाठ पक्की बांधा’
भारत कोकाटे यांच्या हातावर शिवबंधन बांधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ, यांच्या शिवबंधनाची गाठ पक्की बांधा, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडाले. आमदार कोकाटे यांनी 1999 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र पुढे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. हाच धागा पकडून ठाकरे यांनी मिश्कील विधान केल्याचे बोलले जात आहे. मात्र भारत यांनी ‘साहेब, तुम्ही बांधलेली गाठ पक्कीच आहे.’ असे हजरजबाबी उत्तर दिले.

हेही वाचा:

Back to top button