नाशिक : शहर पोलिसांच्या श्वान पथकात ‘अल्फा’ची एन्ट्री | पुढारी

नाशिक : शहर पोलिसांच्या श्वान पथकात ‘अल्फा’ची एन्ट्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच स्फोटक वस्तू शोधण्यासाठी शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात प्रथमच बेल्जियन मेलिनोइस प्रजातीचे श्वान दाखल करण्यात आले आहे. या श्वानाचे नाव ‘अल्फा’ ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील पोलिस दलात स्फोटक शोध, अमली पदार्थ आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी फँटम केनाइन्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे दिलेले बेल्जियन मेलिनोइस प्रजातीचे श्वान तैनात केले आहे. सोलापूर शहरात महाराष्ट्र पोलिसांच्या पहिल्या बेल्जियन मेलिनोइस श्वानापासून सुरुवात झाली, त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, कोल्हापूर, बीड, लातूर आणि नागपूर पोलिस विभागांना या प्रजातीच्या श्वानांचा उपयोग होत आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणार्‍या नेव्ही सील टीमसोबत असलेले के-9 कैरो हेदेखील बेल्जियन मेलिनोइस आहे. आयएसआयएसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादीचा खात्मा करण्यासाठी आर्मीच्या डेल्टा फोर्स एलिट युनिटसह बेल्जियन मेलिनोइस प्रजातीच्या श्वानाचा वापर करण्यात आला आहे. सध्या जगभरात के-9 ऑपरेशन्समध्ये काम करणारे अनेक बेल्जियन मेलिनोइस प्रजातीचे श्वान आहेत जे तेवढेच धाडसी, निष्ठावान आणि नि:स्वार्थी म्हणून ओळखले जातात. शहर पोलिस दलात ‘अल्फा’चे स्वागत करण्यात आले. यावेळी नाशिक शहर पोलिसांच्या श्वान पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हुंबे, पोलिस निरीक्षक गायकवाड, हवालदार चव्हाणके, शेटे, नंदू उगले, बाविस्कर, शेख उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button