सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील चोंढी शिवारात शुक्रवारी (दि.5) सायंकाळी 6 च्या सुमारास ढगफुटीसदृश पावसाने परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान झाले. शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त होऊन मका, कोथिंबीर, सोयाबीनची पिके वाहून गेली.
मुसळधार पावसामुळे दीपक दिनकर आरोटे यांच्या शेतीमधील मका, कोथिंबीर, सोयाबीनच्या रोपांचे अतोनात नुकसान झाले. आरोटे यांच्यासह अनेक शेतकर्यांची शेतातील उभी पिके पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. आसमानी संकटामुळे घास हिरावून गेल्याने मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. काही शेतकर्यांच्या जमिनीचे बांधदेखील फुटून वाहून गेले. चोंढी गावाच्या शेतशिवारात यंदाच्या पावसाळ्यात शुक्रवारइतका मोठा पाऊस झाला नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील प्रत्येक रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते. शिवारातील सोयाबीन, मका, कोथिंबीर आदी पिके वाहून गेली. आता दुबार पेरणीदेखील शक्य नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.