नाशिक : वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

नाशिक : वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक: पुढारी वृत्तसेवा: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात १६ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) चोळमुख (ता. पेठ) येथील आश्रमशाळेत घडली. भारती महादू गायकवाड असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या तोंडावरच विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

आदिवासी विकास विभागाच्या चोळमुखच्या आश्रमशाळेत दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या भारती गायकवाड हिने शाळेच्या वसतिगृहामध्ये गळफास घेत जीवनयात्रा संपविली. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर नाशिक प्रकल्प कार्यालयातर्फे तत्काळ चौकशीसाठी पथक शाळेत पाठविण्यात आले. मुख्याध्यापक-अधीक्षकांविरोधात शाळेत अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. शिक्षणाशिवाय इतर कामे करून घेतली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन चौकशीसाठी एक समिती नियुक्त करण्यात आली. समितीची चौकशी पूर्ण झाली असून, अहवालही तयार करण्यात आल्याचे समजते.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर संबंधित मुख्याध्यापकाची चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतरही विद्यार्थिनीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे चुकीचे आहे. विद्यार्थिनीच्या आत्महत्येस शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक हेच जबाबदार आहे.

– गणेश गवळी, युवा कार्याध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

Back to top button