नाशिक : ‘ताई, हे गुगल पे काय असतं? आमच्याकडे नाय असं काही’ | पुढारी

नाशिक : ‘ताई, हे गुगल पे काय असतं? आमच्याकडे नाय असं काही’

नाशिक : अंजली राऊत-भगत
‘ताई, हे गुगल पे काय असतं?, हा प्रश्न आहे नाशिकमध्ये भरलेल्या रानभाज्या महोत्सवातील स्टॉलधारक ग्रामीण भागातील महिलांचा. एकीकडे ‘डिजिटल पेमेंट’चा वापर वाढला असल्याचे बोलले जात असताना दुसरीकडे मात्र स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकपासून अवघ्या काही किमी अंतरावर राहणार्‍या महिलांच्या गावीही ‘डिजिटल पेमेंट’ नसल्याचे चित्र समोर आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘क्षितिज नवे, विश्वास नवा’ ही ‘उमेद’ घेऊन महिला बचतगटाच्या माध्यमातून आदिवासी महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, नव्या उमेदीने व्यवसाय जगतात उतरताना या महिला डिजिटल व्यवहारापासून अनभिज्ञ असल्याचे चित्र या महोत्सवातून समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत प्रत्येक भारतीयाने ‘डिजिटल पेमेंट’साठी पुढे यावे, यासाठी विविध आर्थिक व्यवहारांना चालना दिली जात आहे. यामध्ये गावपातळीवरही डिजिटल पेमेंटसाठी जनजागृती केली जात आहे. शिवाय बँकिंग प्रणालीच्या प्रवाहामध्ये गावस्तरावरील प्रत्येक गृहिणीचे स्वत:चे बँक खाते असावे, यासाठीही ‘जनधन’सारखी योजना अस्तित्वात आहे. मात्र, या सर्व उपाययोजना अद्यापही तळागाळात पोहोचल्या नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. नाशिकमध्ये भरविण्यात आलेल्या पंचायत समिती येथील रानभाज्या महोत्सवात हे चित्र प्रकर्षाने दिसून आले. नुकतेच उद्घाटन होऊन महोत्सवाचा दुसरा शुक्रवार रानभाज्या महोत्सवाने चांगलाच गर्दीने फुललेला दिसून आला. नाशिककरांसाठी सकाळी 8 पासूनच महोत्सव सुरू होतो. त्यासाठी नाशिकपासून अवघ्या 5 ते 25 किलोमीटर अंतरावरील नाशिक, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यांतील महिलांनी रानोवनी भटकून, शेतातील ढेकळांतून ताज्या रानभाज्या खुडून विक्रीसाठी आणल्या आहेत.

या ताज्या रानभाज्यांची चव चाखण्यासाठी नाशिककरही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. शुक्रवारी सकाळी नागरिकांनी भरपावसात हजेरी लावली खरी; मात्र, काही महिलांनी ‘ऑनलाइन पेमेंट’च्या भरवशावर सवयीप्रमाणे रोख रक्कम सोबत आणली नाही. भाजीपाला खरेदी केल्यानंतर ऑनलाइन पेमेंटसाठी संबंधित स्टॉलधारक महिलांना ‘गुगल पे, फोन पे आहे का, अशी विचारणा केली. त्यावर ‘हे गुगल पे काय असतं?, आमच्याकडे नाय असं काही’ असे उत्तर दिले. त्यानंतर या महिलांनी त्यांना मोबाइलद्वारे पेमेंट करण्याबाबत समजावून सांगितले.

त्यावर या महिलांनी ‘आमच्याकडे कसला आलाय मोबाइल’ असे उत्तर दिले, हे ऐकून ग्राहक महिलाही अवाक् झाल्या.
जिथे मोबाइलच नाही तिथे ‘डिजिटल पेमेंट’ची अपेक्षा तरी कशी धरायची, असे मनाशी पुटपुटत रोख पैसेच नसल्याने त्यांना रानभाज्या न घेताच रित्या हाती परतावे लागले. मात्र, यातून ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यातील दरीचे दर्शन घडल्याचेही दिसून आले.

आशा भाबडेपणाची
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल करणार्‍या देशात ग्रामीण भागातील महिला आजही मोबाइल, इंटरनेटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानापासून अनभिज्ञ असल्याचे वास्तव यातून समोर आले आहे. नाशिकसह पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर यासारख्या तालुक्यांमधील आदिवासी भागांत अद्याप दळणवळणाची पुरेशी साधने नाहीत, रस्ते नाहीत, आरोग्य व्यवस्था नाही, इतकेच काय मोबाइलदेखील नाही. त्यामुळे अशावेळी तेथील नागरिकांकडून ‘डिजिटल पेमेंट’ची आशा करणे निश्चितच भाबडेपणाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

Back to top button