महिलांपेक्षा पुरुष अधिक जगतात! | पुढारी

महिलांपेक्षा पुरुष अधिक जगतात!

कोपेनहेगन : असे म्हटले जाते की पुरुषांच्या तुलनेत महिलाच दीर्घायुष्यी असतात. मात्र, एका नव्या संशोधनातून हे वास्तव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्कच्या वैज्ञानिकांनी नुकत्याच झालेल्या एका पाहणीनंतर असे म्हटले आहे की महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक जगण्याची शक्यता जास्त असते. विशेषतः जर ते विवाहित किंवा पदवीधर असतील तर!

या संशोधनानुसार गेल्या 200 वर्षांच्या काळात पुरुष अधिक जगण्याची शक्यता 25 ते 50 टक्के राहिलेली आहे. यामध्ये सर्व खंड व 199 देशांच्या पुरुषांच्या डेटाचा समावेश आहे. वास्तवात पुरुष किती जगतात याचा छडा लावण्यासाठी वैज्ञानिकांनी गेल्या दोन शतकांमधील वैश्विक लोकसंख्येतील मृत्युमुखी पडणार्‍या स्त्री-पुरुषांची माहिती घेतली.

संशोधकांनी 41 देशांचा डेटा ठेवणार्‍या ह्यूमन मोर्टलिटी डेटाबेसचाही अभ्यास केला. तसेच जर्मनी व ब्रिटनचीही पाहणी केली. याशिवाय वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2019 च्या डेटाचीही पाहणी केली. त्यामधून असे दिसून आले की प्रत्येक चारपैकी एक ते दोन पुरुष सरासरी महिलांच्या तुलनेत अधिक जगतात. सन 1850 पासून महिलांपेक्षा पुरुष अधिक जगण्याची शक्यता 25 ते 50 टक्के आहे. काही ठिकाणी हा आकडा 50 टक्क्यांपेक्षाही अधिक होता.

Back to top button