नाशिक : जिल्हा परिषद आरक्षण सोडत, मतदारयाद्या कार्यक्रम स्थगित | पुढारी

नाशिक : जिल्हा परिषद आरक्षण सोडत, मतदारयाद्या कार्यक्रम स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समित्यांचे गट व गण आरक्षण व मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम पुढील सूचना येईपर्यंत थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबल्याचे मानले जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि.2) राज्यातील जिल्हा परिषद गटसंख्या किमान 55 ते कमाल 85 मर्यादा करण्याचा निर्णय रद्द करीत गटांची रचना 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच मागील महिन्यात काढलेली आरक्षण सोडत प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यपालांनी या निर्णयाप्रमाणे अध्यादेश राजपत्रात प्रसिद्ध केला. यामुळे निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. 5) राज्यातील 25 जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवत आरक्षण सोडत कार्यक्रम व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यपालांनी राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार राज्य सरकारने 2021 च्या जनगणनेनंतरच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गणांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत 2011 च्या जनगणनेनुसार किमान 50 व कमाल 75 गटांच्या मर्यादेतच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button