धुळ्यात महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन | पुढारी

धुळ्यात महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महागाईमुळे देशातील जनता त्रस्त असताना केंद्र सरकारला जनतेचे सोयर सुतक नाही. जीवनावश्यक वस्तूंवर देखील आता जीएसटीच्या माध्यमातून कर लादला जात असल्याने जनता हवालदिल झाली आहे. मात्र सरकारच्या या अन्यायाविरुद्ध काँग्रेसचा कार्यकर्ता कोणत्याही दडपणाला न घाबरता जनतेचा आवाज उठवणार असल्याचा इशारा काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांनी दिला.

धुळ्यात आज महागाईच्या प्रश्नावरून काँग्रेसने आक्रमक होत आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, प्रदेश कार्यकारिणीचे युवराज करनकाळ, नगरसेवक साबीर खान यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार कुणाल पाटील यांनी केंद्र सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. काँग्रेस पक्ष जनतेचा आवाज उठवण्याचे काम करतो आहे. महागाईच्या विरोधात आज प्रत्येक गावात आणि शहरात काँग्रेसचा कार्यकर्ता सामान्य माणसाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आहे. केंद्रातील सरकार प्रत्येक गोष्टीवर जीएसटीच्या माध्यमातून कर आकारून जनतेला त्रासात आणण्याचे काम करते आहे. या देशातील जनतेचे कंबरडे आधीच महागाईने मोडले आहे. गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांचे दर गगनाला भिडले असून आता सरकारने खाण्याच्या वस्तूंवर देखील जीएसटी लावला आहे. विशेषतः या देशातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना देखील जीएसटी द्यावा लागणार आहे. उपचारावर जीएसटी लावण्याचे पाप केंद्र सरकारने केले असून जनता आता त्रस्त झाली आहे. या सरकारला महागाईचे सोयरसुतक नसून सरकारमधील काही मंत्री महागाई वाढत असेल तर खाणे पिणे बंद करा, असे संताप जनक वाक्य वापरून जनतेच्या भावनांचा खेळ करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केली.

सरकारने इडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कितीही दडपशाही केली तरी काँग्रेस कार्यकर्ता हा जनतेसाठी आवाज उठवणारच असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. जीएसटी वाढवून गोरगरिबांच्या खिशातील पैसा उद्योगपतींच्या खिशात घालण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे असा आरोप पाटील यांनी केला. यापुढे महागाई आणि केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाही विरोधात जनतेने रस्त्यावर उतरावे असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले. आंदोलनप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी भाजपने अवलंबलेल्या धोरणांवर घणाघाती प्रहार केला. यावेळी झालेल्या आंदोलनात माजी खासदार बापू चौरे, प्रदेश सचिव युवराज करनकाळ, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते साबीर खान, खरेदी-विक्रीचे चेअरमन लहू पाटील, माजी पं. स.सभापती भगवान गर्दे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button