नाशिक : गणेशमूर्तीसाठी 11 किलो चांदी संकलित; मंदिर उभारणीची तयारी | पुढारी

नाशिक : गणेशमूर्तीसाठी 11 किलो चांदी संकलित; मंदिर उभारणीची तयारी

देवळा : पुढारी वृत्तसेवा
येथील मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी नगरसेवक मनोज आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सवावरही निर्बंध होते. यंदा मात्र हा उत्सव अधिक उत्साहात साजरा होणार आहे. शहरात विघ्नहर्ता गणपतीचे सुस्वरूप मंदिर असावे व त्यात बाप्पाची चांदीची मूर्ती असावी, असा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यावर मंगळवारी (दि.2) नगरपंचायत सभागृहात नियोजन बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर होते. मूर्तीसाठी आहेर यांनी स्वत: दोन किलो चांदी देत संकलन मोहिमेचा श्रीगणेशा केला. यामुळे चांदीचा गणपती असणारे मंदिर उभारणीच्या कामाला गती मिळाली.

आहेर व अमृतकार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत कोठावदे आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या संकल्पनेतून याबाबत नियोजन चालू होते. त्याविषयी बैठकीत दिशा ठरवण्यात आली. त्यात गणपती मंदिराचे ठिकाण, चांदीच्या मूर्तीत जास्तीत जास्त ग्रामस्थांचा व भाविकांचा सहभाग, समिती स्थापना, आगामी गणेशोत्सव आदी विषयांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे आतापर्यंत 11 किलो चांदी संकलित झाली असून, त्यात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक आहेर यांची निवड झाली. यंदाच्या उत्सवाचे नियोजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, गटनेते संभाजी आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, अनिल आहेर, डॉ. प्रशांत निकम, योगेश वाघमारे, राजेंद्र वडनेरे, राजेंद्र अहिरराव, भगवान खरोटे, सुनील आहेर, सुधाकर आहेर, लक्ष्मीकांत आहेर, पुंडलीक आहेर, कौतिक पवार, अमोल आहेर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button