अक्कलकोट तालुक्यात ढगफुटीसदृश्य स्थिती | पुढारी

अक्कलकोट तालुक्यात ढगफुटीसदृश्य स्थिती

अक्कलकोट/हंजगी : पुढारी वृत्तसेवा आश्लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बोरगावात पावसाने रौद्ररूप धारण केले आहे, पावसामुळे शेती पिकांसह शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक ओढ्यांना पूर आला आहे. एकूणच उत्तर अक्कलकोट तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाला आहे. बोरगावसह तिन गावांचा संपर्क तुटला आहे.

बोरगाव दे, घोळसगाव, किणीवाडी, काझी कणबस बादोले यासह आदी गावांत पावसाने थैमान घातला आहे. घोळसगाव येथील तलाव 100 टक्के भरला असून ओव्हरफ्लो वाहत आहे. बोरगाव येथील पीर राजेबागसवार साठवण तलाव 100 टक्के भरले. बोरगावचा ओढा दुथडी भरून वाहत आहे.

बुधवारी दुपारी दोन वाजता आश्लेषा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत होते. गेल्या आठ दिवसांपासून हवामानामध्ये कमालीची घट झाली असून, आर्द्रते बरोबरच उष्णतेच्या झळा सुद्धा सोसाव्या लागत होत्या. बोरगाव येथील कोळी तलावही 100 टक्के भरला आहे.

त्यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल पडलेल्या पावसामुळे ऊस, मूग, उडीद, सोयाबीन, तूर आदी पिके ज्यादा पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. कामात शेतकरी व्यस्त असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतीची कामे करत असताना तारांबळ उडाली. समाधानकारक पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तालुक्यात मोठा पाऊस पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. बोरगावनजीक असलेल्या पुलावर भरपूर पाणी वाहत असल्याने दुपारी तीन वाजलेपासून घोळसगाव व वागदरीकडे जाणार्‍या लोकांचा मार्ग बंद पडला होता. त्यामुळे गावचा संपर्क तुटला होता.

यंदाच्या हंगामातील सगळ्यात मोठा पाऊस पडला आहे. अडीच तास पडलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. काही क्षणातच संपूर्ण भाग जलमय झाला. अनेक गावांचा संपर्क तुटला. बोरगावात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्यांचे नुकसान झाले आहे.

पावसाने तालुक्याला कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचा फटका बसत आहे. बुधवारच्या आश्लेषाच्या नक्षत्राचा जोरदार पावसामुळे उडीद, तूर, मूग, सोयाबीन, सूर्यफूल आदी पिके वाया जात आहेत. शासनाने 30 हजार रुपये पीक विमा मंजूर करून शेतकर्‍यांना हातभार लावावा.
– राजकुमार भंगे, शेतकरी, चपळगाव

Back to top button