नाशिक : दुसरी अल्पवयीन मुलगी शोधली, संशयित पाचही आरोपींना पोलीस कोठडी | पुढारी

नाशिक : दुसरी अल्पवयीन मुलगी शोधली, संशयित पाचही आरोपींना पोलीस कोठडी

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
ओझरमधून एका अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असताना पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून, ओझर पोलिसांनी मध्य प्रदेशात दुसरी अल्पवयीनदेखील ताब्यात घेतली आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील पाचही आरोपींना पिंपळगाव न्यायालयासमोर उभे हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासात हे आरोपी अल्पवयीन मुलींसोबतच विधवा आणि घटस्फोटीत महिलांना सावज करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

ओझर शहरातून एका 14 वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले होते. या मुलीचा शोध घेण्यासाठी ओझर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेज पाहून प्रियंका देवीदास पाटील, रा. कार्बन नाका, सातपूर, नाशिक (सध्या ओझर, ता. निफाड) या महिलेला ताब्यात घेण्यात आले. या महिलेला पीडित मुलीबाबत विचारपूस केली असता तिने तिची मैत्रीण रत्ना कोळी (रा. ओझर, 10 वा मैल, ता. निफाड) हिच्या मदतीने शिरपूर येथील एक महिला व पुरुषास एक लाख 75 हजार रुपये किमतीस विक्री केल्याचे समोर आले.

याबाबत ओझर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक शिरपूर व गुजरात राज्यात रवाना झाले होते. त्याप्रमाणे ओझर पोलिस ठाणेकडील तपास पथकाने शिरपूर, जि. धुळे परिसरातून रत्ना विक्रम कोळी, सुरेखाबाई जागो मिला (रा. शिरपूर, जि. धुळे) यांना तपासासाठी ताब्यात घेतले. या महिलांना पीडित अल्पवयीन मुलीबाबत विचारपूस केली असता, त्यांनी या मुलीस बडोदा, राज्य गुजरात या ठिकाणी लग्नासाठी दिले असल्याचे सांगितले. त्यावरून तपास पथकाने गुजरात राज्यात या ठिकाणी जाऊन पीडित मुलीचा शोध घेतला. यानंतर ही मुलगी मध्य प्रदेश राज्यातील भिकणगाव जिल्हयात असल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाने लागलीच भिकणगाव, मध्य प्रदेश ) या ठिकाणी रवाना झाले.

या ठिकाणी बाबूराम येडू मनसारे, गोविंद नानुराम मनसारे (रा. लखापूर, जि. भिकणगाव) यांच्या घरात ही अल्पवयीन पीडित मुलगी मिळून आली. तिला पोलिसांनी सुखरुपरीत्या ताब्यात घेतले होते. तसेच वरील पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असता पिंपळगाव न्यायालयाने त्यांना 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दुसरी अल्पवयीन मुलगी शोधली
एप्रिल महिन्यात ओझर येथील भगतसिंगनगर येथून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती तिचीदेखील विक्री या संशयित आरोपींनी केल्याची माहिती पोलिस चौकशीत समोर आल्याने ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणपत जाधव, दुर्गैश बैरागी, रावसाहेब मोरे, अमोल सूर्यवंशी, एकनाथ हळदे, महिला पोलिस गांगवे यांचे पथक मध्य प्रदेशातील भिकणगाव जिल्ह्यातील भगवानपुरा येथून या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले.

हेही वाचा :

Back to top button