मनपातील अग्निशमनच्या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला | पुढारी

मनपातील अग्निशमनच्या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाने नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी फायरमन या पदासह विविध संवर्गांतील पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार भरतीसाठी मनपा प्रशासनाकडून तयारी सुरू असतानाच, मनपा आयुक्त रमेश पवार यांची दांडी उडाल्याने या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत गरजेची असून, याबाबत नूतन आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

राज्य शासनाने फायरमन, लीडिंग फायरमन, सबऑफिसर, चालक यंत्रचालक, वायरलेस ऑपरेटर या पदांसाठी सध्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त आणखी जागा नव्याने मंजूर केल्या आहेत. या मंजूर पदांपैकी फायरमन या पदाकरिताच सेवा प्रवेश नियमावली मंजूर असल्याने या पदांसाठी भरती करण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली. फायरमन या संवर्गाच्या सध्या आस्थापनेवर 151 जागा असून, नव्याने 148 जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. परंतु, सध्या केवळ 90 फायरमन असून, 209 जागा रिक्त आहेत. यासंदर्भातील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्यासमोर प्रस्ताव सादर करण्यात आला. भरती प्रक्रिया पारदर्शक होण्याकरिता एजन्सीची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच, राज्य शासनाकडून रमेश पवार यांची उचलबांगडी करण्यात आली आणि भरती प्रक्रियेचा प्रस्तावही अधुराच राहिला. आता नवनियुक्त आयुक्त याबाबत काय आणि कशी भूमिका घेतात, यावरच फायरमन पदाच्या भरतीची दिशा ठरणार आहे.

इतर विभागांचेच वाहनचालक
राज्य शासनाने अग्निशमन विभागासाठी नव्याने 98 चालक यंत्रचालकाची पदे मंजूर केली आहेत. परंतु, भरतीच नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील इतर विभागांतील वाहनचालकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी वाहनचालक नसल्याने अग्निशमन विभागाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच वायरलेस ऑपरेटरची सहा पदेही शासनाने मंजूर केलेली आहेत.

मनपाला फायर ऑफिसरच नाही
फायरमन व्यतिरिक्त अग्निशमन विभागात लीडिंग फायरमनच्या 98 पैकी 14 जागाच भरलेल्या आहेत. सबऑफिसरचे 18 पैकी केवळ एक पद कार्यरत असून, स्टेशन ऑफिसरच्या सहापैकी एकाच पदावर समाधान मानावे लागत आहे. फायर ऑफिसरच्या दोन आणि डेप्युटी फायर ऑफिसरची एक जागा मंजूर असली, तरी या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर आजमितीस एकाही अधिकार्‍याची नेमणूक नाही.

हेही वाचा:

Back to top button