पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स जळून खाक | पुढारी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स जळून खाक

पाटस : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस (ता. दौंड) भागवतवाडी येथे प्रवासी ट्रॅव्हल्स गाडीला अचानक आग लागून ती खाक झाली. ही घटना मंगळवारी (दि. २) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. यातील १७ प्रवासी सुखरूप असून या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.

मंगळवारी रात्री १ च्या दरम्यान पुणे येथील भोसरीतुन अहमदपूरला जात असताना ओम साईराम कंपनीची ट्रॅव्हल्स बस (एमएच ११ सीएच ९९६६) ही पाटस येथून पुढे जात होती. यावेळी चालू ट्रॅव्हल्स गाडीच्या बोनटमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे गाडीला आग लागली. गाडी चालक विठ्ठल पंढरीनाथ वडारी यांना हे समजताच त्यांनी गाडी रोडच्या बाजूला घेऊन थांबवली.

याच क्षणी गाडीमध्ये असणाऱ्या क्लिनर सचिन प्रकाश कांबळे यांनी गाडीत असणाऱ्या १७ प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले व पाणी मारून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. यादरम्यान आगीने मोठा पेट घेऊन संपूर्ण गाडी जळून खाक झाली. या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नसल्याची माहीती यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार, हवालदार भाऊसाहेब बंडगर, पोलीस अजित काळे, समीर भालेराव, वाहतूक पोलीस व अग्नीशमक दल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Back to top button