नाशिकमध्ये मुलींची परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद | पुढारी

नाशिकमध्ये मुलींची परराज्यात विक्री करणारी टोळी जेरबंद

नाशिक : जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन परराज्यात विकणा-या टोळीला जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. ऑपरेशन मुस्कान मोहिम अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ओझर पोलिसांनी मोठ्या शिताफीने कारवाई करत टोळीतील दोन महिला व दोन पुरुष यांना अटक केली आहे. मुलींना फूस लावून पळवून नेल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओझर शहरातून एका 14 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीचा शोध घेण्यासाठी ओझर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला ही मुलीस घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन पोलिसांनी तपास गतिमान केला. पोलिसांनी प्रियंका देविदास पाटील (ओझर) हीस ताब्यात घेतले असता तीने या मुलीची विक्री केली असल्याचे सांगितले. त्यानुसार पथक मुलीच्या शोधात रवाना झाले. तपासाअंती मुलगी मध्यप्रदेश राज्यातील खरगोण जिल्ह्यात असल्याचे समजले. पोलिसांनी या मुलीला सुखरुप सोडवले असून याप्रकरणात रत्ना विक्रम कोळी (ओझर), सुरेखाबाई जागो भिला (रा. शिरपूर, धुळे) तर नानुराम येडू मनसारे व गोविंद नानुराम मनसारे यांना खरगोण जिल्ह्यातून ताब्यात घेतले.

या गुन्ह्याच्या तपासात ताब्यात घेतलेले संशयित आरोपी महिला व पुरुषांनी अल्पवयीन मुलीस परराज्यात लग्न लावून देण्यासाठी  फुस लावून पळवून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच यापूर्वी देखील मुलींना अशाच प्रकारे लग्नासाठी फुस लावून पळवून नेले असल्याचे समोर आले. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button