मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा : नाशिक मनपा 5 हजार कोटींचे प्रकल्प सादर करणार | पुढारी

मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा : नाशिक मनपा 5 हजार कोटींचे प्रकल्प सादर करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच नाशिक दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या या दौर्‍याकडे नाशिककरांचे लक्ष लागले असून, या दौर्‍याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दत्तक’ घेतलेल्या नाशिकसाठी मुख्यमंत्री काय भेट देणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. यादृष्टीने नाशिक मनपा प्रशासनाने जवळपास पाच हजार कोटींचे विविध प्रकल्प आणि विकासकामांची जंत्रीच मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास नाशिक दत्तक घेण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या घोषणेप्रमाणे नाशिककरांनी भाजपच्या हाती सत्ता दिली. सत्ता येताच फडणवीस यांनी देशातील पहिली टायरबेस ‘निओ मेट्रो’ नाशिकला साकारणार असल्याची घोषणा केली होती. फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रो निओसाठी 2,100 कोटींची तरतूद केली गेली. महामेट्रोने या प्रकल्पासाठी सर्वेक्षणही पूर्ण केले असून, येत्या काळात त्याचे काम सुरू होईल. भाजपचे माजी महापौर सतीश कुलकर्णी तसेच माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी आडगाव शिवारात आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्क साकारण्याचे प्रस्ताव तयार केले. याबाबतचे सादरीकरण पूर्ण झाले आहे. यासह भाजपने ‘नमामि गोदा’, स्मार्ट सिटी अभियानांतर्गत गावठाण विकास योजना, मखमलाबाद शिवारात हरित क्षेत्र विकास परियोजना, स्मार्ट स्कूल, 400 कोटींची मलनिस्सारण योजना, 300 कोटींची पाणीपुरवठा योजना, दारणा व गंगापूर धरणातून नव्याने थेट जलवाहिनी यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना तयार केल्या असून, त्यांचे प्रस्तावही राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने या शासनाने महापालिकेच्या बहुतांश प्रकल्प व योजना लालफितीत गुंडाळून ठेवल्या होत्या.

आता पुन्हा सत्तांतर घडून भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्याने नाशिकच्या योजना साकारण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तर महापालिकेत बैठक घेत आयटी हब, लॉजिस्टिक पार्क तसेच दोन उड्डाणपुलांवर फुली मारली होती. आता हे प्रकल्पही पुन्हा उचल खाणार आहेत.

मुख्यमंत्री मनपात घेणार प्रकल्पांचा आढावा
मुख्यमंत्री शिंदे शनिवारी (दि. 30) मालेगाव येथे आढावा बैठक घेणार आहेत. यात ते विभागातील विकासकामांचा आढावा घेतील. त्यामुळे नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे नाशिकच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा अहवाल सादर करतानाच प्रलंबित योजनांसाठी राज्य शासनाकडून निधीची मागणी केली जाणार आहे. गुरुवारी (दि. 28) आयुक्त कार्यालयात बैठक होऊन संबंधित योजना व प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा:

Back to top button