धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा | पुढारी

धुळे : खोट्या योजनेच्या नावाखाली विधवा महिलांना लाखोंचा गंडा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : विधवा परितक्त्या योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळ्याच्या साक्री रोडवर राहणारा राहुल उर्फ रावसाहेब दिगंबर गोसावी तसेच मुंबई येथे राहणारा प्रशांत खरात या दोघांनी जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2019 या दरम्यान धुळे शहरात श्रीमती रंजना रमेश इंगळे यांच्या निवासस्थानी शहरातील विविध भागात राहणाऱ्या विधवा महिलांना आमिष दाखवले. दिल्ली येथील विधवा परितक्त्या योजना केंद्राच्या नावाने या महिलांना खोटी योजना समजावून सांगण्यात आली.

त्यानंतर 90 महिलांकडून योजनेचे फॉर्म फी व चलन फी म्हणून 4 लाख 84 हजार 200 रुपये गोळा करण्यात आले. त्याचप्रमाणे पुष्पाबाई सुरेश जाधव यांची बहीण आशाबाई यांना शाळेत शिपायाची नोकरी लावून देण्यासाठी 50 हजार रुपये घेण्यात आले. या योजनेचे अर्ज भरल्यानंतर योजनेचा लाभ मिळत नसल्याने संबंधित महिलांनी रंजना इंगळे यांच्याशी संपर्क केला. मात्र, इंगळे यांनी गोसावी आणि खरात यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

पैशांची मागणी केली असता त्यांने जीवे ठार करण्याची धमकी दिल्याने रंजना इंगळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघाही आरोपींच्या शोधासाठी शहर पोलिसांनी पथक तयार केले असून त्यांच्या शोधाचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button