नाशिक : मुख्यमंत्र्यांना घेरणार शिवसेना, पोलिस आयुक्तालयावर काढणार मोर्चा | पुढारी

नाशिक : मुख्यमंत्र्यांना घेरणार शिवसेना, पोलिस आयुक्तालयावर काढणार मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 30 जुलैला नाशिक दौर्‍यावर येत असून, याच दौर्‍याचे औचित्य साधून शिवसेना मोर्चाच्या रूपाने शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे शिंदे आणि शिवसैनिक दोन्ही आमने सामने येणार असून, पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, शिवसेनेचे नाशिक मध्य विधानसभेचे अध्यक्ष बाळू कोकणे यांच्या हल्लोखोरांना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला जाणार असल्याचे बोलले जात असले तरी शिंदे यांना घेरण्याचाच शिवसेनेचा उद्देश आहे.

शिंदे सरकारकडून दबाव असल्यामुळेच कोकणे यांच्यावर हल्ला करणार्‍यांना अटक केली जात नसल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. येत्या तीन दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावेळीच पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा बडगुजर यांनी दिलेला आहे. शिवसेनेच्या या इशार्‍यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर नाशिकमध्ये शिंदे गटाच्या समर्थकांनी उपनगर भागात बॅनर प्रसिद्ध केले होते. या बॅनरला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी काळे फासले होते. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि दादा भुसे व सुहास कांदे हे दोन आमदार सध्या शिंदे गटात असले तरी नाशिक शहर व जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी अजून तरी उद्धव ठाकरेंसोबतच खंबीरपणे उभे आहेत. राजकीय नाट्य सुरू असतानाच मध्य विधानसभाप्रमुख बाळू कोकणे या शिवसैनिकावर प्राणघातक हल्ला झाल्याने हा हल्ला कोणी केला यावरून तर्क-वितर्क लढविले जात होते. त्यात आता शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिंदे गटाकडूनच हा हल्ला झाल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. कोकणे यांच्यावर हल्ला करणार्‍यांना पाठीशी घातले जात असून, त्यांना अटक करू नये, असा दबाव शासनाकडून टाकला जात असल्याचा आरोप बडगुजर यांनी केला आहे. कोकणे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवसेना पदाधिकार्‍यांनी पोलिस आयुक्त तसेच उपआयुक्तांची भेट घेत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. परंतु, अद्याप कार्यवाही न झाल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्या नाशिक दौर्‍यावेळी पोलिस आयुक्त कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

आरोपींना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पोलिस आयुक्तालय सोडणार नाही. हल्ला होऊन आठ-दहा दिवस उलटूनही ठोस कारवाई होत नाही याचा अर्थ काय?
– सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना

हेही वाचा :

Back to top button