सोलापूरला लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस | पुढारी

सोलापूरला लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूरच्या विकासाकरिता चर्चेत असलेल्या मुंबई- सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली असल्याची माहिती सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली.

याबाबत खा. जयसिद्धेश्वर यांनी मंगळवारी दिल्लीत ना. अश्विनी यांची भेट घेत रेल्वेसेवा सुरू करण्याची आग्रही मागणी केली. ही सेवा तातडीने सुरू करण्याची ग्वाही यावेळी मंत्र्यांनी दिली.

यावेळी रेल्वे संदर्भातील अन्य मागण्याबाबत चर्चा झाली. संसद भवनात रेल्वे मंत्रालयाच्या कक्षात यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची देखील उपस्थिती होती.

भारत सरकारच्या रेल मंत्रालय द्वारा अत्याधुनिक सुविधा असलेली व कमी वेळेत अधिक अंतर गाठणारी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. रेल मंत्रालय द्वारा देशात विविध भागात सन 2023 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा निर्णय रेल मंत्रालयाने घेतला आहे. सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी रेल्वेने जवळपास आठ तास लागतात. सोलापूर येथून मुंबई व पुण्याला दर दिवशी जवळपास 5 ते 7 हजार प्रवासी शिक्षण,व्यापार व इतर कामानिमित्त प्रवास करत असतात.

मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यास मुंबईहून पुण्यावरून सोलापूरला येणारे व सोलापूरहून वरील दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणार्‍या यात्रेकरूंना हे अंतर साधारणतः निम्म्या वेळेत पार करता येणे शक्य होणार आहे.

सोलापूरातून पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर , हत्तरसंग कुडल सारख्या तीर्थस्थळांना दर्शनासाठी प्रतिवर्षी भारतातून लाखो भाविक येतात. त्यामुळे सोलापूर- द्वारका (गुजरात) नवीन रेल्वे सुरु व्हावी व्हावी.यामुळे सोलापूरसह अन्य जिल्ह्यातून भाविकांना गुजरातला जाणे सोपे होईल, अशीही मागणी यावेळी खा.जयसिध्देश्वर यांनी केली. सोलापुरातून जाणार्‍या बसवा एक्स्प्रेस ला अक्कलकोट रोड येथे प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात यावा. सोलापुरात सुरु असलेली किसान रेल्वे सेवा पुनर्स्थापित करणे, सोलापुर ते त्रिवेंद्रम दरम्यान नवी किसान रेल्वे सेवा सुरु करावी आदी मागण्याही यावेळी रेल्वेमंत्री यांच्याकडे करण्यात आली.

Back to top button