फायनान्स कंपन्यांचा जाच : कर्जासाठी फोनवर तगादा; ग्राहकांना घातला जातोय गंडा | पुढारी

फायनान्स कंपन्यांचा जाच : कर्जासाठी फोनवर तगादा; ग्राहकांना घातला जातोय गंडा

नाशिक : सतीश डोंगरे
कमी व्याजदर, कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही, जामीनदारही नको, काही मिनिटांतच पैसे खात्यावर अशा प्रकारची प्रलोभने दाखवून बळजबरीने कर्ज घेण्यासाठी तगादा लावणारा फोन कॉल एखाद्यास आला नसेल तरच नवल. सध्या अशा प्रकारचे कॉल करून ग्राहकांना फसविण्याचे प्रकार प्रचंड वाढले असून, नकार देऊनदेखील बळजबरीने खात्यावर पैसे पाठवून अवाच्या सवा व्याजदर लावत नागरिकांना लुटले जात आहे. विशेष म्हणजे हा एखाद्याने पैसे भरण्यास नकार दिल्यास, ते वसूल करण्याच्या ट्रिक अंगावर काटा आणणार्‍या आहेत.

एखाद्या फायनान्स कंपनीकडून टीव्ही, फ्रीज, टू-व्हीलर व इतर वस्तूंवर किरकोळ लोन घेतल्यानंतर या कंपन्यांकडे ग्राहकांचा संपूर्ण डाटा उपलब्ध होतो. किरकोळ लोन संपल्यानंतर मात्र या कंपन्या वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकांना फोनवर सारखा तगादा लावतात. त्याव्यतिरिक्त एसएमएस आणि ई-मेलचा मारा करतात. ‘तुम्ही आमचे ग्राहक आहात, त्यामुळे कंपनीने आपल्यासाठी खास ऑफर उपलब्ध करून दिली आहे. झटपट दोन लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला मिळविता येईल. त्याकरिता कुठल्याही कागदपत्रांची गरज लागणार नाही. कोणत्याही कागदपत्रांवर सही करावी लागणार नाही. तुमच्या होकारावरच कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाईल. केवळ तुमची केवायसीची माहिती द्यावी लागेल, तसेच दोन ओळखीच्या लोकांचे मोबाइल नंबर सांगावे लागतील’ अशा प्रकारची बतावणी केली जाते. एखादा ग्राहकाने यास होकार दिल्यास तत्काळ पैसेही ट्रान्स्फरही केले जातात. या सर्व व्यवहारात रेकॉर्डेड फोन कॉल पुरावा म्हणून गृहित धरला जातो. झटपट व्यवहार होत असल्याने अनेक जण यास बळी पडत आहेत. मात्र, एका ठराविक काळानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याची ग्राहकास जाणीव होते.

एक तर या कर्जाची रक्कम जवळपास दुपटीने भरावी लागते. तसेच ईएमआयदेखील अचानक वाढविले जातात. एखादा ईएमआय थकल्यास त्यावर चार्जेसही मोठ्या प्रमाणात आकारले जातात. एखाद्याने कर्ज भरण्यास असमर्थता दाखविल्यास ते वसूल करण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक कंपनीच्या एजंटकडून राबविल्या जातात. अगोदर सातत्याने फोन करून पैसे भरण्यासाठी तगादा लावला जातो. त्यानंतर जामीनदार म्हणून दिलेल्या दोन मोबाइल नंबरधारकांनादेखील दमदाटी केली जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सिबिल खराब केले जाते. एखाद्याने कर्ज भरल्यानंतरही हप्त्यांची रक्कम शिल्लक असल्याचे सांगून अतिरिक्त चार्जेसच्या नावावर पैसे उकळले जातात. सध्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या कर्जांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

घटना 1

एका ग्राहकाने एका कंपनीकडून 30 हजारांच्या कर्जावर फ्रीज घेतला. त्या फ्रीजचे ईएमआय त्याने नियमितपणे भरले. त्यानंतर मात्र त्या कंपनीकडून दोन लाख रुपयांच्या कर्जासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यास फोनचा सपाटाच लावला आहे. प्रत्येक वेळी त्याच्याकडून या कर्जासाठी नकार दिला गेला. मात्र, एके दिवशी कंपनीच्या एजंटने अतिरेकच केला. त्या ग्राहकाने नकार देऊनदेखील तुम्हाला कर्ज घ्यावेच लागेल, असा तगादा लावला. त्या ग्राहकांना एक-दोन नव्हे, तर तब्बल चार नंबर ब्लॉक केले. मात्र, अशातही त्यास अजूनही संबंधित कंपनीचे फोन येतच आहेत. कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर फोन येत असल्याने, त्यांच्या वरिष्ठांना तक्रार करण्याचीही सोय नाही.

घटना 2

सातपूरमधील रत्नाकर जाधव नावाच्या व्यक्तीने एका कंपनीकडून कर्ज घेऊन मोबाइल खरेदी केला. सुरुवातीला मोबाइलचे बारा ईएमआय भरावे लागतील, असे सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र त्यास 14 ईएमआय भरावे लागले. आता दोन लाख रुपये कर्ज घ्या, अशा प्रकारचे फोन येत आहेत. नकार देऊनदेखील फोनचा मारा सुरूच आहे. एके दिवशी तर कर्ज घेण्यासाठी समोरच्या व्यक्तीने चक्क त्यांना शिवीगाळ केली. त्याचबरोबर मोबाइलचे कर्ज घेताना ओळखीचे जे दोन मोबाइल नंबर दिले, त्यावरदेखील संपर्क साधून त्यांनाही शिवीगाळ केली.

Back to top button