नगर : माउलींच्या जयघोषाने नेवासे दुमदुमले

नेवासा H एकादशीनिमित्त भाविकांची झालेली मांदियाळी. इनसेट : पैस खांबाचे छायाचित्र. (छाया : कैलास शिंदे)
नेवासा H एकादशीनिमित्त भाविकांची झालेली मांदियाळी. इनसेट : पैस खांबाचे छायाचित्र. (छाया : कैलास शिंदे)
Published on
Updated on

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर माउलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त माउलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी पुंडलिक वरदे…हरी विठ्ठल.. श्री ज्ञानदेव तुकारामच्या जयघोषाने नेवासा नगरी दुमदुमली. नामाचा जयघोष करीत दर्शन घेतले. दर्शनासाठी पहाटेपासूनच तीर्थक्षेत्र नेवासानगरीत भाविकांची गर्दी झाली होती.

एकादशीनिमित्त काल (दि.24) पहाटे 4 च्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोष करीत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभव नहार व शीतल नहार, योगेश रासने व रुपाली रासने, वसंत रासने व सविता रासने यांच्या हस्ते पैस खांबास सपत्नीक अभिषेक घालण्यात आला. यावेळी पांडुगुरू जोशी यांनी पौरोहित्य केले. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वासराव गडाख, ज्ञानेश्वर शिंदे, कृष्णाभाऊ पिसोटे, कैलास जाधव, व्यापारी देविदास साळुंके, राम महाराज खरवंडीकर, समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भय्या कावरे, शिवा राजगिरे, संदीप आढाव, रामभाऊ कडू, गुरुप्रसाद देशपांडे, सुधीर चव्हाण, रमेश शिंदे आदी उपस्थित होते.

दर्शनासाठी एक किमी रांग

एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाबाहेर दर्शनबारी रांगेसह मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. एक किलोमीटर अंतरावर दर्शन बारी रांग दिसत होती. मंदिर प्रांगणात आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळ व पंचगंगा सीड्स कंपनीच्या वतीने बाळासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे, प्रभाकर शिंदे यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी मोफत साबुदाणा खिचडीचे वाटप यावेळी करण्यात आले.

मंदिराकडे येणार्‍या रस्त्यावर रविराज व सचिन तलवार, नगरसेवक नंदकुमार पाटील यांच्या घुले पाटील पतसंस्थेसह सर्व सुवर्णकार समाजाच्या वतीने संत नरहरी महाराज मंदिरातही भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. देवगडचे भास्करगिरी महाराज, उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरी महाराज, नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, संभाजीराव फाटके यांनीही 'पैस'चे दर्शन घेतले.

पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकांत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेनिमित्त बंदोबस्तासाठी नेवासा होमगार्ड जवानांनी समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या अधिपत्याखाली निष्काम सेवा दिली. फळविक्रेत्यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्याने भाविकांना रस्त्यावरून जाण्यासाठी सुकर मार्ग तयार करण्यात आला होता. मुख्य ठिकाणी वाहन पार्किंग करण्यात आली होती. चारचाकी वाहनांसाठी नेवासा बुद्रूक येथील विश्वेश्वर नाथबाबा विद्यालय व नेवासा मार्केट कमिटी प्रांगणात व्यवस्था करण्यात आली होती.

कामिका वद्य एकादशीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत ज्ञानेश्वर महाराज पैसचे मंदिरासह मंदिराचे निर्माते वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांच्या समाधी मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती. आषाढी वद्य एकादशीमुळे शहरासह संत ज्ञानेश्वर मंदिर रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

पावसातही पायी दिंड्यांचा गजर

आषाढी वद्य कामिका एकादशीनिमित्त नेवासा तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव या भागातील शेकडो पायी दिंड्यांनी पावसात ज्ञानोबा माउली तुकारामचा गजर करत नेवाशात हजेरी लावली. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने त्यांचे स्वागत केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news