नाशिकच्या ‘घोटी’त भूकबळी ; खायला न मिळाल्याने एकाचा मृत्यू | पुढारी

नाशिकच्या 'घोटी'त भूकबळी ; खायला न मिळाल्याने एकाचा मृत्यू

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
बाजार समितीमध्ये पत्र्याच्या शेडशेजारी एका आदिम कातकरी समाजाच्या व्यक्तीचा उपासमारीने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या सहकार्याने मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घोटी : भूकबळी ठरलेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करताना पदाधिकारी.

इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील गोपाळ दिवे (वय अंदाजे 46) हे पत्नीपासून विभक्त होते. पोटाची खळगी भरण्याकरिता घोटी शहरात दाखल झाले होते. भंगार गोळा करून गुजराण करीत असत. पावसाळी वातावरणामुळे ते थंडीतापाने फणफणल्याने तीन दिवस उपाशीपोटी राहिले व त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे यांनी पोलिस प्रशासनाची मदत घेऊन संबंधित व्यक्तीची ओळख पटवली. नातेवाइकांसमक्ष दिवे यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिस हवालदार शरद कोठुळे, उत्तम बोराडे, श्रमजीवी संघटनेचे राजू वाघ, विकी वाघ, भाऊ वाघ आदींसह संघटनेचे सेवादलातील युवक उपस्थित होते.

Back to top button