संजय राऊत उठल्यापासून ऊठसूट बेताल वक्तव्य करीत असता : खा. गोडसेंची जहरी टीका | पुढारी

संजय राऊत उठल्यापासून ऊठसूट बेताल वक्तव्य करीत असता : खा. गोडसेंची जहरी टीका

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर आम्ही सोळा खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत आपण भाजपसोबतच जायला हवे, तेच आपले नैसर्गिक मित्र आहे. महाविकास आघाडीत आपले काम होत नाही. याविषयी आपण विचार करावा, अशी विनंती केली. मात्र, याविषयी निर्णय होत नसल्याने आम्ही बारा खासदार शिंदे गटासोबत गेलो, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा जाहीर मेळावा उपनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार गोडसे म्हणाले की, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेससोबत केलेली युती म्हणजेच महाविकास आघाडीत शिवसेनेचे आमदार, खासदार तसेच शिवसैनिक समाधानी नव्हते. अडीच वर्षे आमदार, खासदारांनी सहन केले. शेवटी सहनशीलतेचा अंत झाल्याने चाळीस आमदारांनी उठाव केला. मेळाव्याला माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, इगतपुरीचे देवीदास जाधव, त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त भूषण अडसरे, नासाकाचे माजी अध्यक्ष तानाजी गायधनी, शिवसेना महिला आघाडीच्या लक्ष्मी ताठे, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख योगेश म्हस्के, कामगार नेते जगदीश गोडसे, विलास सांडखोरे, बाळा गव्हाणे, दत्ता सुजगुरे आदी उपस्थित होते.

राऊतांवर जहरी टीका
खासदार गोडसे यांनी मेळाव्यात संजय राऊत यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत राज्यातील सेना खासदारांनी राऊत यांना आवरा, ते प्रसिद्धिमाध्यमांसमोर काहीही बोलतात. त्याला जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचीच बदनामी होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी बघू, असे उत्तर दिले. राऊत यांनी त्यांच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात जनतेच्या कोणत्या प्रश्नाला वाचा फोडली, हे दाखवून द्यावे. सकाळी उठल्या उठल्या प्रसिद्धिमाध्यमांसोबत ऊठसूट बेताल वक्तव्य करीत असल्याचे म्हटले.

वडील सेनेत अन् मुलगा शिंदे गटात
शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश धोंगडे हे आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यात हजर होते, तर त्यांचे चिरंजीव अभिजित धोंगडे हे खासदार गोडसे यांच्या समर्थन मेळाव्यात हजर होते. वडील सेनेत, तर चिरंजीव शिंदे गटात, अशी चर्चा यावेळी केली जात होती .

बाबूराव आढाव शिंदे गटात
शिवसेनेचे माजी शिक्षण मंडळ सदस्य बाबूराव आढाव हे शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा नाशिकरोड परिसरात केली जाते आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुण्यानंतर आता नाशिकमध्येही शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button