नाशिक : ‘अनुराधा’च्या प्रवासावर पडदा ; 1975 मध्ये उद्घाटनाला आले होते हे ‘दिग्गज’ | पुढारी

नाशिक : ‘अनुराधा’च्या प्रवासावर पडदा ; 1975 मध्ये उद्घाटनाला आले होते हे 'दिग्गज'

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
एकेकाळी उत्तर महाराष्ट्राचे गौरवस्थान म्हणून समजले जाणारे व सुमारे 47 वर्षांचा इतिहास असलेले नाशिककरांचे आवडते असे अनुराधा सिनेमागृह अखेर मंगळवार (दि.19) पासून पाडण्यास प्रारंभ झाला. या ठिकाणी लवकरच व्यावसायिक संकुल उभारले जाण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील पहिले वातानुकूलित सिनेमागृह म्हणून ‘अनुराधा’ची ओळख होती. 1975 मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राजकुमार कोहली दिग्दर्शित व सुनील दत्त, जितेंद्र, रीना रॉय यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या ‘नागिन’ या चित्रपटाने या सिनेमागृहाचा प्रारंभ झाला होता. उद्घाटनाला स्वतः दिग्दर्शक राजकुमार कोहली, सुनील दत्त, रीना रॉय, जितेंद्र उपस्थित होते. सुरुवातीला या चित्रपटगृहात रोज पाच शो दाखविले जात असत.

दादा कोंडकेंच्या चित्रपटांचा मुक्काम

त्या काळात मुंबईबरोबर अनुराधा सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित होत. या चित्रपटगृहात दादा कोंडके यांचे प्रत्येक चित्रपट किमान 16 आठवडे मुक्काम करत. हिंदी चित्रपटापैकी फिरोज खान यांचा ‘कुर्बानी’, जितेंद्रचा ‘मेरी आवाज सुनो’ या चित्रपटाचे दररोज पाच शो असायचे. मनोजकुमार, हेमामालिनी यांचा ‘दस नंबरी’, जितेंद्र यांचा ‘आशा’ हे चित्रपट 10 आठवडे सुरू होते.

मालिकांमुळे लागली घरघर

1990 नंतर घरोघरी टीव्ही आल्याने दूरदर्शन मालिका सुरू झाल्याने सिनेमागृह प्रेक्षकांविना ओस पडू लागले. त्यात नाशिकरोडचे रेजिमेंटल व बिटको चित्रपटगृहाचा समावेश होता. 1 मे 2015 ला अनुराधा सिनेमागृह बंद करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी या चित्रपटगृहाला आगसुद्धा लागली होती. गेल्या सात वर्षांपासून बंद असलेले सिनेमागृह अखेर मंगळवारपासून पाडण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा :

Back to top button