पुणे : उपनगरात दिवस अपघातांचा, कुठे सिलिंडरचे स्फोट; तर कुठे पीएमपी बसचे ब्रेक फेल | पुढारी

पुणे : उपनगरात दिवस अपघातांचा, कुठे सिलिंडरचे स्फोट; तर कुठे पीएमपी बसचे ब्रेक फेल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शाळेत जाण्यासाठी वडिलांच्या दुचाकीवरून निघालेल्या चिमुकलीसह वडिलाचाही अपघाती मृत्यूच्या बातमीने उपनगराची सकाळ झाली. त्यातून सावरते न सावरतेच तोच सिंहगड रस्त्यावर आग, कात्रजमध्ये पीएमपीचा अपघात, मुकुंदनगरमध्ये दुचाकीने घेतलेला पेट, अशा विविध अपघातांच्या घटनांनी दिवस मावळला.

माणिकबागेत दुकानाला आग
सिंहगड रोड : पुढारी वृत्तसेवा
माणिकबागेतील ‘श्री गजानन शेगाव कचोरी’ या दुकानात मंगळवारी सकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या दुकानासह आजूबाजूच्या काही दुकानांतील फर्निचर आणि इतर वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे चार लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानदाराकडून देण्यात आली.

सकाळी पावणेनऊच्या सुमारास प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला आगीची कल्पना दिली. 10 मिनिटांत अग्निशमन दल पोचले व आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या कारवाईमध्ये सिंहगड अग्निशमन दलाचे तांडेल पांडुरंग तांबे, जवान सतीश डाखले, संजू चव्हाण, संदीप पवार, जरे यांनी आग आटोक्यात आणण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या आगीमध्ये परिसरातील तीन दुकानांचे सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व दुकानांचे निऑन साइन बोर्ड जळाले असून, यापैकी ‘द बेल्जियम वॉफल’ दुकानाचे आगीत एसी, फ्रिज आदी गोष्टींचे खूप नुकसान झाले आहे.

विमा न काढणे दुकानदारांना पडले महागात

जिथे सिलिंडर, आग, तेल अशा ज्वलनशील पदार्थांचा संबंध असतो, तेथे दुकानाचा विमा काढणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा असे व्यावसायिक विमा काढणे टाळतात. यामुळे अशा घटना झाल्यावर हे नुकसान दुकानचालक आणि मालक यांनाच सहन करावे लागते. माणिकबाग येथील अनेक दुकानदारांनी दुकानांचा विमा काढलेला नसल्याचे कळते आहे.

तीन आठवड्यांपूर्वी ‘श्री गजानन शेगाव कचोरी’ची फ्रँचाइजी घेतली होती. लाकडी फर्निचरसाठी देखील बराच खर्च केला होता. मात्र, आजच्या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सुमीत राऊत, दुकानमालक

कात्रज-लोहगाव बसला अपघात
धनकवडी : कात्रज- लोहगाव पीएमपी बसचा ब्रेक फेल झाल्याने धनकवडीतील शाहू बँक चौकात अपघात झाला. ही घटना आज मंगळवार दुपारी सव्वादोनच्या दरम्यान झाली. अपघातात बसमधील सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कात्रज ते लोहगावकडे जाणारी रूट नं. 24 पीएमपीची भारती हॉस्पिटल थांब्याच्या पुढे तीव्र उताराने शाहू बँक चौकाकडे जाताना या बसचे ब्रेक फेल झाले.

ही बाब लक्षात येताच बसचालकाने त्वरित बस उड्डाणपुलाखालील बीआरटी मार्गातील कॉलमला धडकवली. त्यामुळे ती बस शाहू चौकातच थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या सहा जणांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

मोपेड दुचाकीने घेतला पेट
महर्षी नगर : मुकुंदनगर येथे सुजय गार्डन रस्त्यावर एका मोपेडने मंगळवारी पेट घेतल्याची घटना घडली. दुचाकीवरून जात असलेल्या स्वाती भालेराव आणि त्यांच्या मुलीला गाडीतून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच गाडी बाजूला घेऊन गाडीपासून दूर होताच गाडीने लगेच पेट घेतला. अग्निशमन विभागाकडून लगेच ही आग विझवण्यात आली असली, तरी गाडी जुनी असल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परिसरात काही काळ रस्त्यावर बघ्याची गर्दी निर्माण झाली होती. पोलिस प्रशासनाने काही वेळातच वाहतूक सुरळीत केली.

Back to top button