नाशिक : नाफेडकडून खरेदी थांबताच कांद्याच्या दरात घसरण | पुढारी

नाशिक : नाफेडकडून खरेदी थांबताच कांद्याच्या दरात घसरण

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
बाजार स्थिरीकरण योजनेतून केंद्राचे नाफेडमार्फत कांदा खरेदीचे 2.5 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती येताच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदादर घसरले. येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1140 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांदादरातील घसरणीने शेतकरीवर्गात नाराजी निर्माण झाली.

नाफेडकडून कांदा खरेदी 16 जुलैला थांबविण्यात आली. याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावावर सुरू झाला असून, गत सप्ताहाच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या कमाल दरात 350 रु. प्रतिक्विंटलची घसरण झाली. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 1394 वाहनांतून सुमारे 20,112 क्विंटल कांद्याची आवक होऊन बाजारभाव किमान 501 रुपये, कमाल 1,451 रुपये, तर सरासरी 1,140 रुपये प्रतिक्विंटल होते.

शेतकर्‍यांचा भ्रमनिरास : दिघोळे
नाफेडने यावर्षी तब्बल अडीच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु प्रत्यक्षात नाफेडकडून रडतखडत शेतकर्‍यांचा कांदा खरेदी करण्यात आला. त्यापासून शेतकर्‍यांना कवडीचाही फायदा झाला नाही. दरवर्षी नाफेडच्या कांदा खरेदीनंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात वाढ होते. परंतु यावर्षी नाफेडने इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करूनही कांदा उत्पादकांना अत्यल्प दर मिळाल्याने शेतकर्‍यांचा भ—मनिरास झाला असल्याचे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांचे म्हणणे आहे.

नाफेडने साठा पूर्ण झाला म्हणून कांदा खरेदी बंद केली. येत्या काही दिवसांतच त्याचा परिणाम बाजारावर होऊन कांद्याचे दर आणखी खाली येतील. नाफेडने शेतकर्‍यांचा विचार करता कांदा खरेदी सुरू ठेवणे आवश्यक आहे.
– रामभाऊ भोसले, शेतकरी गोंदेगाव

साठवलेला कांदा पावसामुळे खराब
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध बाजार समितींमध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात होती. नाफेडच्या कांदा खरेदीमुळे शेतकर्‍यांच्या कांद्याला चांगला दर मिळत होता. मात्र, आता कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने नाफेडकडून कांद्याची खरेदी बंद करण्यात आली. चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकरीवर्गाने कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे चाळीत साठवलेला कांदा हा खराब झाला असून, भावही घसरल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला.

हेही वाचा :

Back to top button