नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर | पुढारी

नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर

सिन्नर (जि. नाशिक) : संदीप भोर
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेची (स्टाइस) पंचवार्षिक निवडणूक जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप, खंडन-मंडन या बाबींनी चांगली गाजली. यापूर्वी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असे. यंदा तिरंगी लढत झाली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखाली सहकार उद्योग विकास आघाडीने बहुमत म्हणजेच बारापैकी आठ जागा मिळवत सत्ता अबाधित ठेवली आहे.

आमदार माणिकराव कोकाटे समर्थक सुधा माळोदे-गडाख, अविनाश तांबे यांच्या नेतृत्वातील पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. आमदार कोकाटे यांचेच कट्टर कार्यकर्ते दिलीपराव शिंदे यांनी बंडखोरी करीत सत्ता स्थापनेचे रचलेले मनसुबे धुळीस मिळाले. त्याहीपुढे जाऊन सांगायचे झाले तर भोपळाही फोडता न आल्याने त्यांची शोभा झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आमदार कोकाटे यांच्या मजबूत पाठिंब्यावर तांबे-गडाख यांची पॅनल निर्मिती सुरू असतानाच दिलीपराव शिंदे यांनी किशोर देशमुख, नारायण पाटील, संजय शिंदे यांच्या साथीने सवतासुभा निर्माण केला. आमदार कोकाटे यांनी दोन्ही गटांचे मनोमिलन घडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. मात्र शिंदे यांनी तडजोडीस नकार दर्शविला, अशी चर्चा आहे. त्यांचा हा नकारच आवारे गटाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा ठरला.

स्टाइसची गत पंचवार्षिक निवडणुकीत 370 च्या आसपास मते होती. त्यापैकी जी आवारे गटाच्या विजयात मोलाचा वाटा ठरु शकतात अशी तीसेक मते शिंदे यांनी न्यायालयीन लढाई लढून घटवत बाजी मारली. शिंदे हे अभ्यासू नेते आहेत. राजकीय, सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव मोठा आहे. इथे आवारे यांना हिसका दिल्याने त्यांचा विश्वास दुणावला. आता गतवेळची मते राखून विरोधकांचा पाडाव करायचा, असे त्यांचे गणित होते. मात्र ते सुटले नाही.

तिकडे आवारे यांनी गतवेळी विरोधी पॅनलमधून निवडून आलेल्या सुनील कुंदे यांच्यासह काही नव्या विश्वासू उद्योजकांची मोट बांधली. शिंदे यांनी तिसेक मते बाद ठरविल्यानंतरही आपली मागची मते राखली. किंबहुना त्यातही बेरीज करण्याचा हेतू ठेवून काम केले. आमदार कोकाटे यांच्या विरोधात राजाभाऊ वाजे सत्तेत नाहीत म्हणून खासदार हेमंत गोडसे यांच्या छबीचा खुबीने वापर केला. खासदार गोडसे यांच्या मदतीने आपण उद्योजकांचे प्रश्न सोडवू शकतो, असा विश्वास उद्योजकांना दिला. वेळोवेळी शिंदे असो अथवा तांबे या दोघांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. याच नीतीचे रूपांतर विजयात झाले, असे म्हणावे लागेल.

वसाहतीचे संस्थापक स्व. सूर्यभान गडाख यांच्या कन्या सुधा माळोदे गडाख यांची सक्रियता आणि आमदार कोकाटे यांचा पाठिंबा ही तांबे-गडाख यांच्या नेतृत्वातील पॅनलची जमेची बाजू होती. मात्र, त्यांच्या विजयात खरा अडथळा ठरला तो शिंदे गटाचा. शिंदे यांनी पॅनलनिर्मितीत जुळवून घेतले असते तर चित्र काहीसे वेगळे दिसू शकले असते. कारण या दोघांच्या मतांची बेरीज बरेच काही सांगून जाते. असो निवडणूक संपली आहे. आवारे गटाला आता संस्था आणि उद्योजक हिताला प्राधान्य द्यावे लागेल.

बेलगाम प्रचार…

या निवडणुकीत वरकरणी कितीही शिस्तबद्धतेने प्रचार सुरू असल्याचे दिसत असले तरी उद्योग विश्वाला न शोभणारा प्रचार यंदाच्या तिरंगी लढतीत बघायला मिळाला. न्यायालयीन लढाई तर झालीच पण, पोलिस ठाण्यात गुन्हे, एकमेकांना दमदाटी करण्यापर्यंत उमेदवारांची, त्यांच्या समर्थकांची मजल गेली. ती बहुतांश उद्योजकांना पटली नसल्याचे बोलले जात आहे. यापुढच्या काळात अशा बाबींना लगाम घातला जावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button