पुणे : तिच्यामुळे वाचले तीन जणांचे जीव; महिलेकडून अवयवदान | पुढारी

पुणे : तिच्यामुळे वाचले तीन जणांचे जीव; महिलेकडून अवयवदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा: मरावे परी कीर्तीरूपी उरावे ही म्हण मरणासन्नावस्थेत असलेल्या महिलेच्या अवयवदानाने खरी करून दाखवली आहे. लष्करातील दोन जवानांसह रुबी हॉलमधील एका रुग्णावर अवयव प्रत्यारोपित करण्यात आले. तिचे डोळे कमांड रुग्णालयातील सशस्त्र दलाच्या नेत्रपेढीत जतन करून ठेवण्यात आले आहेत. एका दुर्दैवी घटनेमुळे मरणासन्नावस्थेत असलेल्या एका तरुण महिलेला पुणे येथील दक्षिण कमांडच्या रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या मेंदूचे कार्य सुरू आहे, असे दर्शविणारी कोणतीही लक्षणे तिच्या शरीरात दिसत नव्हती.

मृत्यूनंतर करण्यात येणार्‍या अवयवदानाच्या संकल्पनेबाबत त्या महिलेच्या कुटुंबीयांना माहिती होती. अवयवदानाच्या निर्णयानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (झेडटीसीसी) आणि लष्कराच्या अवयव पुनर्प्राप्ती आणि प्रत्यारोपण प्राधिकरण यांना याबद्दल सूचित करण्यात आले. 14 जुलै रोजी महिलेच्या शरीरातील मूत्रपिंडासारखे महत्त्वाचे अवयव भारतीय लष्करात सेवा बजावणार्‍या दोन जवानांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले, तर डोळे कमांड रुग्णालयातील सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालय संकुलातील नेत्रपेढीत सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात आले. त्या महिलेचे यकृत पुण्याच्या रुबी हॉल दवाखान्यातील गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले.

Back to top button