Service charge :‘सर्व्हिस चार्ज’वर बंदी असूनही हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांकडून वसुली | पुढारी

Service charge :‘सर्व्हिस चार्ज’वर बंदी असूनही हॉटेल्स, रेस्टॉरंट चालकांकडून वसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट चालकांनी ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज अर्थात सेवाकर वसूल करणे पूर्णपणे अयोग्य असून, केंद्र सरकारकडून याबाबतची कायदेशीर चौकट तयार करण्याबाबत प्रयत्नही केले जात असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. त्याचबरोबर सेवाकर आकारला जाऊ नये, याबाबतचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, अशातही शहरातील काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालक ग्राहकांकडून सेवाकर वसुली करीत असल्याचे दिसून येत आहे.

हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये सेवाकरच्या नावे ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात असल्याने, सेवाकरावर बंदी आणावी, अशी मागणी ग्राहक संघटनांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीनंतर सेवाकर आकारण्यास मनाई करण्याबाबतचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, अशातही बहुतांश हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांकडून सेवाकर आकारला जात आहे.
सध्या कोरोनाचे सावट बर्‍यापैकी कमी झाल्याने, हॉटेल्स-रेस्टॉरंटवरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. अशात नागरिकांचीही हॉटेल्समध्ये गर्दी होत आहे. परंतु, ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज वसूल केला जात असल्याने, ग्राहकांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे. दरम्यान, सर्व्हिस चार्जची मागणी करणार्‍यांना ग्राहकांनीच नकार द्यायला हवा, असाही एक मतप्रवाह समोर येत आहे. त्याचबरोबर एखाद्या हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्जकरिता जास्तच आग्रह केला जात असेल, तर त्या हॉटेलचालकाची रीतसर तक्रार करावी, असे सांगितले जात आहे.

जेव्हापासून जीएसटी लागू करण्यात आला आहे, तेव्हापासून सर्व्हिस चार्ज आकारला जात नाही. त्यामुळे हा विषय पुढे आणण्याचे नेमके कारण काय? हे समजण्यापलीकडचे आहे. ग्राहकांकडून वेटर्सना स्वखुशीने टीप स्वरूपात काही पैसे दिले जातात, त्यास जर सर्व्हिस चार्ज म्हटले जात असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. बिलामध्ये सर्व्हिस चार्ज कोणी आकारणार नाही, याची मला खात्री आहे.
– संजय चव्हाण,
अध्यक्ष, हॉटेल्स, असोसिएशन

हेही वाचा :

Back to top button