मायाबाजाराचे कठोर वास्तव | पुढारी

मायाबाजाराचे कठोर वास्तव

  • श्रीराम ग. पचिंद्रे

आज समाजातील सामान्य घटकांना छळणार्‍या आणि पिळणार्‍या लबाडांच्या टोळ्याच्या टोळ्या फोफावलेल्या आहेत. अशा आधुनिक लुटारूंच्या कारवायांना हतबल सामान्य तसेच पैशाचा हव्यास असणारे लोभी लोक बळी पडत आहेत. कशी असते या लबाडांची कार्यपद्धती?

एका थोर प्रवचनकारांनी संपत्तीची फार सुंदर व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात, ‘पुढील दाराने येते ती लक्ष्मी आणि मागील दाराने येतो तो पैसा!’ पैसा कोणत्याही भल्याबुर्‍या मार्गाने मिळवता येतो; पण ‘लक्ष्मी’ प्राप्त होण्यासाठी अपार परिश्रम करावे लागतात. वाईट मार्गाने पैसा येतो. धवलशुभ्र पवित्र मार्गाने लक्ष्मी येते. कठोर परिश्रमांनी बुद्धिकौशल्याने आणि प्रामाणिकपण लाभते ती लक्ष्मी असते; पण याचे भान न बाळगता सध्या सोप्या किंबहुना वाईट मार्गाने, वाकड्या वाटेने, सहज प्राप्त होईल अशा कोणत्याही मार्गाने पैसा मिळवण्याकडे बहुतांश लोकांचा कल वाढत आहे. सध्या वर्तमानपत्रात आपण सारेच ‘आकर्षक परताव्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा’, ‘दामदुप्पट रक्कम देण्याच्या योजनेतून हजारोंना कोट्यवधीचा गंडा’ अशा बातम्या सर्रास वाचतो.

अशा प्रकारच्या फसवणुकीच्या दररोज एक- दोन बातम्या तरी आपल्याला वाचायला मिळतात. अशा फसवणुकीसाठी आकर्षक पोषाखाचे सुशिक्षित, रुबाबदार पुरुष, सुंदर तरुणी सकृतदर्शनी देखणे कार्यालय थाटून बसतात. अतिशय आकर्षक योजना तयार करून त्या आपल्या ग्राहकांना, म्हणजे आपल्या ‘बळीच्या बकर्‍यां’ना गाठतात. त्यांच्यासमोर योजना सादर करतात. आकर्षक आणि अत्याधुनिक पद्धतीने लॅपटॉपवर प्रेझेंटेशन देतात आणि पहिल्या महिन्यापासून परतावा कसा मिळेल, ते भरभक्कम कसे असेल आणि दरमहा पैसे घ्यायचे नसतील तर ठरावीक मुदतीनंतर दुप्पट रक्कम तीही अवघ्या तीन वर्षांत इत्यादी आमिषे समोर ठेवली जातात. समोरच्या माणसाला व्यवस्थित गुंडाळून टाकले जाते. त्याने गुंतवणूक केली की, सुरुवातीचे काही महिने त्याला परतावा दिला जातो. असे हजारो ‘बळीचे बकरे’ जमा झाल्यानंतर मग परतावा देण्यास टाळाटाळ सुरू होते आणि एके दिवशी हे लोक अचानक आपले कार्यालय आणि बाडबिस्तारा आवरून पसार होतात. त्यांचे संपर्क क्रमांक लागेनासे होतात. अशा अनेक फसव्या योजनांचा सुळसुळाट सध्या झालेला आहे.

आचार्य अत्रे यांच्या ‘मी कसा झालो’ या पुस्तकात ‘मी आरोपी कसा झालो?’ हे एक प्रकरण आहे. त्यात सहगल नावाचा पंजाबी माणूस ‘पीपल्स ओन’ ही कंपनी स्थापन करतो. ही गुंतवणुकीची साखळी योजना असते. ती कर्ज देणारी योजना असते. म्हणजे अधिकच आकर्षक; पण कर्जासाठी इच्छुकांकडून आधी काही रक्कम घ्यायची आणि नंतर त्यांना कर्ज देणार असे त्यात आमिष होते; पण त्यात एक अट महत्त्वाची होती, ती अशी की, एका कर्जेच्छुने आणखी तीन लोक आणायचे. अशी साखळी वाढत गेली. सुरुवातीच्या एक-दोघांना कर्ज मिळाले आणि नंतरच्या सगळ्या लोकांचे पैसे बुडाले. सहगल पैसे गोळा करून पंजाबला पळून गेला; पण एका कवडीचाही लाभ न झालेले आचार्य अत्र्यांचे दिनूकाका मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडले. अत्रेही सापडले; पण ते निर्दोष ठरले. दिनूकाकांना कारावास झाला. आपल्या अलीकडच्या काळात बोकाळलेल्या साखळी योजनांचे मूळ हे आपल्याला त्या काळात सापडते.

मध्यंतरी आपल्याकडे सर्व रोग बरे करणारी गादी ही योजना बोकाळली होती. पंधराएक वर्षांपूर्वी या योजनेने असंख्य लोकांना झपाटून टाकले होते. भरघोस लाभ मिळण्याच्या लोभापायी अनेकांनी आपला बाकीचा कामधंदा सोडून ती गादी आपल्या जवळच्या लोकांच्या गळ्यात मारून नफा कमवायचा धंदा सुरू केला होता. त्या काळात त्या गादीची किंमत लाख-सव्वा लाख रुपये होती. अशा प्रकारचे भूल घालणारे मायाजाल लोकांना फशी पाडत असते. थोड्याच दिवसात ते नष्ट होते. कारण, ते मायाजालच असते. कोणतेही मायाजाल कधी स्थायी स्वरूपाचे नसतेच.

अलीकडच्या काळात उत्तर भारतातील एक पूर्ण गावच फसव्या योजनांच्या जाळ्यात लोकांना खेचून त्यांंना गंडा घालणार्‍या लोकांनी भरलेले आहे. सगळेच लोक एकमेकाला सामील आहेत. एखादी स्त्री मधाळ आवाजात संपर्क साधते, ‘तुमच्या मोबाईल नंबरला वीस लाखांची लॉटरी लागलेली आहे. तुम्हाला वीस लाखांची आलिशान गाडी मिळेल. गाडी नको असेल, तर रोख पैसही दिले जातील.त्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आम्हाला व्हॉटस् अ‍ॅपवरून पाठवा. वीस लाख रुपये तुमच्या नावावर जमा करण्यासाठी आधी तुम्हाला आमच्याकडे वीस हजार रुपये भरून नोंदणी करावी लागेल.’ कुणी तसे वीस हजार भरले, तर तेव्हापासून तो संपर्क क्रमांक बंद होतो. त्या स्त्रीचा वा पुरुषाचा कुठेही, कधीही पुन्हा संपर्क होत नाही. एका पुरुषाने एका पोलिस अधिकारी महिलेशी संपर्क साधल्यावर त्या अधिकारी बाईंनी त्याला ‘तुम्ही मला वीस लाख रुपये देणारच आहात, तर त्यातूनच वीस हजार कापून घेऊन मला उरलेली रक्कम द्या.’ त्यावर त्या फसव्या माणसाने ‘नहीं नहीं, ऐसा नहीं हो सकता. तुम्हें पहले बीस हजार भरनेही चाहिए.’ असे सांगितले. हे सगळेच संभाषण हिंदी भाषेत होत असते. कारण, हे फसवे लोक उत्तर भारतातून बोलत असतात.

अशाच प्रकारे ‘सर, तुम्हारे फेसबुक अकाऊंटपर लॉटरी निकली है, पचास लाख रुपये की है। सिर्फ आपको हमारें नंबर पर पचास हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरनी है। ’ असेही सांगून भुरळ पाडली जाते. त्यातून काहीजण फशी पडतात. फसव्या गुंतवणूक योजनेपेक्षा ही योजना अधिक भुरळ घालणारी असते. लोकांच्या भोळेपणाचा, त्यांच्या विवशतेचा, संपत्तीच्या अतिहव्यासाचा गैरफायदा घेणार्‍या टोळ्याच सध्या मोठ्या प्रमाणावर वेगाने कार्यत झालेल्या आहेत. मोहाला बळी पडून कुणी गुंतवणूक केलीच, तर तो साफ बुडाल्यानंतर गाव सोडून परागंदा होणार्‍या टोळ्या आहेत. दूर गावावरून संपर्क साधून गूगल पे, फोन पे, खाते क्रमांक यावर पैसे मागवून माणूस फसल्यानंतर आपले सीम कार्ड फेकून देणार्‍या टोळ्या कार्यरत आहेत. आपला कार्यभाग साधण्यासाठी फसव्या पण अतिशय आकर्षक अशा भरघोस परताव्याच्या गुंतवणूक योजना राबवण्यासाठी ज्याच्या अधिक ओळखी आहेत, जनसंपर्क मोठा आहे, ज्याच्या बोलण्यात मिठास आहे, अशा लोकांना आधी आपल्या जाळ्यात ओढून, पहिल्यांदा त्यांनाच आपल्या योजनेचा भक्कम लाभ देऊन नंतर त्यांच्याच मार्फत लोकांना फशी पाडायला लावणार्‍या अधिक सुशिक्षित बिलंदर चोरांच्या टोळ्या देशभर पसरलेल्या आहेत. त्यांनी टाकलेल्या जाळ्यात पन्नास टक्के तरी खुळे लोक सापडतात आणि नंतर पश्चाताप करत राहतात. आता आवश्यकता आहे ती अधिक सावधानतेची, सतर्कतेची!

Back to top button