नाशिक : जरीफ बाबा हत्येतील चौघे गजाआड, एक अद्याप फरार | पुढारी

नाशिक : जरीफ बाबा हत्येतील चौघे गजाआड, एक अद्याप फरार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संपत्तीच्या वादातून अफगाणी निर्वासित व सुफी धर्मगुरू ख्वाजा सय्यद जरीफ चिश्ती (28, रा. वावी, ता. सिन्नर) यांच्या हत्येप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी जरीफ बाबांचा सहकारी, माजी वाहनचालकासह अन्य दोघे अशा चौघांना अटक केली. बाबांवर गोळी झाडणार्‍यासह आणखी एक संशयित फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येवला येथील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत दि. 5 जुलैला सायंकाळी साडेसातच्या सुमारास जरीफ बाबा यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. त्यात जरीफ बाबा यांचा जागीच मृत्यू झाला. मारेकर्‍यांनी बाबांचे वाहनचालक अफजल अहमद कुर्बान खान (34, रा. सिन्नर, मूळ उत्तर प्रदेश) याच्यासह त्याच्या भावावरही प्राणघातक हल्ला केला होता. अफजल खानच्या फिर्यादीवरून येवला पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तपास करून जरीफ बाबांच्या एका सेवेकर्‍याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी जरीफ बाबा वापरत असलेली व संशयितांनी पळवून नेलेली कार संगमनेर येथून हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी बदलापूर येथून तिघा संशयितांना पकडले. या खून प्रकरणात पोलिसांनी जरीफ बाबांचा सेवेकरी गफार अहमद खान, गणेश उर्फ देवा बाबासाहेब झिंजाड उर्फ पाटील (रा. लोणी, जि. अहमदनगर), माजी वाहनचालक रवींद्र चांगदेव तोरे (रा. कोळपेवाडी, जि. अहमदनगर) व पवन पोपट आहेर (रा. येवला) यांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, येवला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक निरीक्षक खंडागळे, सहायक उपनिरीक्षक नाना शिरोळे, अंमलदार रवींद्र वानखेडे, जालिंदर खराटे, सुशांत मरकड, सचिन पिंगळे, विनोद टिळे, उदय पाठक आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

सेवेकरीच उठला जिवावर
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, निर्वासित असल्याने जरीफ बाबास भारतात मालमत्ता खरेदी करता येत नव्हती. त्यामुळे जरीफ बाबाने भक्तांकडून मिळालेल्या देणगी व सोशल मीडियातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांचा सेवेकरी गफार खान याच्या नावे जिल्ह्यात जागा, वाहन खरेदी केले होते. ही मालमत्ता हडपण्यासाठी संशयित गफार खान व रवींद्र तोरे यांनी कट रचून जरीफ बाबांचा खून केला. जरीफ बाबा यांची पत्नी गरोदर असल्याने त्यांच्या बाळाचा भारतात जन्म झाल्यास संपत्ती वारसाच्या नावे करण्याची भीती संशयितांना वाटत असल्याचेही पोलिस तपासात समोर येत आहे.

मृतदेह अफगाणिस्तानला पोहोचवणार
ग्रामीण पोलिसांनी अफगाणिस्तान दूतावासाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली होती. जरीफ बाबा यांचे नातलग नाशिकला येण्याचा अंदाज होता. मात्र, ते न आल्याने कायदेशीर प्रक्रिया करून जरीफ बाबा यांचा मृतदेह येत्या तीन ते चार दिवसांत अफगाणिस्तानला पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button