

मडगाव ; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या 15 दिवसांच्या आत मडगाव शहरात क्षुल्लक कारणावरून खुनाची दुसरी घटना घडली. वाढदिवसाच्या दिवशीच मुख्तार बदानी (29) या युवकाचा खून झाला. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी त्वरित कारवाई करून विनोद जाळकर (30), सुरेश जाळकर (29), अक्षय भोवे (24), मोहम्मद शेख (31) व आसिफ नागरची (29) या पाच जणांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, 13 जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली. मुख्तार याने आझादनगरी येथे वाढदिवसा निमित्त मित्रांसाठी पार्टी आयोजित केली होती. मित्रांना घेऊन तू पार्टी करतोस, आम्हाला का बोलावले नाही असे म्हणत सुरेश गँग म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या गँगचे युवक तिथे आले आणि त्यांनी मुख्तार यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयितांनी मुख्तार याच्या डोक्यावर वार केला असता तो जखमी होऊन बेशुद्ध झाला. मुख्तारला इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भावाला मारहाण करत असल्याचे पाहून मुख्तार याच्या चुलत भावाने संशयितांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला असता, या गँगने त्यालाही मारहाण केली असून, सध्या तो इस्पितळात उपचार घेत आहे.
या सुरेश गँगने यापूर्वीही या वस्तीत असे प्रकार केले आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार करूनही काही फायदा झाला नव्हता अशी माहिती स्थानिकांनी दिली. खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच याठिकाणी धाव घेतली व संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
या कारवाईत मडगाव पोलिस उपअधीक्षक शिवेंदू भूषण यांच्या मार्गदर्शनाखाली मडगाव पोलिस निरीक्षक फिलॉमेना कोस्ता, मायना कुडतरी पोलिस निरीक्षक मोहन गावडे, कोलवा पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
आजादनगरी येथे मुख्तार बदानी याचा खून झाल्याचे समजताच येथील स्थानिक चवताळून उठले आणि सकाळी येथील शेकडो स्थानिकांनी माजी आमदार बाबू आजगावकर यांच्यासह मडगाव पोलीस स्थानकावर मोर्चा आणला. संशयितावर त्वरित कारवाई न केल्यास मयत मुख्तार याचा मृतदेह पोलीस स्थानाकासमोर आणून ठेवू, असा इशारा दिला. बाबू यांनी संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कायदेशीर राहणार्या लोकांचे खून करण्यात येतात तर बेकायदेशीर वस्ती करून राहणार्या लोक मनमानी करतात, असेही ते यावेळी म्हणाले.
चुकीचे वृत्त आणि गोंधळ…
पोलिसांनी रात्रीच घटनेची माहिती मिळाल्यावर संशयितांना ताब्यात घेतले होते. शिवाय एका वृत्त वाहिनेने पोलिसांनी फक्त एकालाच अटक केल्याचे दाखविल्याने लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता, परिणामी स्थानिक चवताळून उठले होते. लोकांचा रोष पाहून पोलिसांनी पाचही संशयितांना रीतसर अटक केली व त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला. मात्र शेकडो लोकांनी एकदमच पोलीस स्थानकावर जमाव करून गोंधळ घातल्याने, तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.