Gurupournima : देश, परदेशातील समर्थ केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात | पुढारी

Gurupournima : देश, परदेशातील समर्थ केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

नाशिक : दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह राज्यभरात, देशात आणि परदेशातील समर्थ केंद्रामध्ये आज अमाप उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवामार्गाच्या दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुमाऊली प. पू अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर गुरुपीठात चंद्रकांतदादा मोरे यांच्या उपस्थितीत हा मंगलमय सोहळा पार पडला. विशेषतः दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर येथे दिवसभर मुसळधार पाऊस सुरु असूनही सेवेकरी, भाविकांचा उत्साह कायम होता.
अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवा मार्गांतर्गत आज जगभर हजारो समर्थ केंद्र सक्रिय असून लाखो-करोडो सेवेकऱ्यांच्या दृष्टीने गुरुपौर्णिमा सोहळ्यास अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच या पावन दिवसाची सर्व आतुरतेने वाट पाहत असतात. आषाढी पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमादिनी गुरुपूजन करण्याची पवित्र प्रथा भारतभर असल्यामुळे या दिवशी श्री. स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी लाखोंची पावलं दिंडोरी, त्र्यंबकसह सर्व समर्थ केंद्राकडे वळतात.
यावर्षी शनिवार दि. (9) पासूनच सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असे विभागवार येऊन रोज गुरुपूजन करून या मंगलमय सोहळ्यात आता पर्यंत लाखो भाविक, सेवेकरी, वारकऱ्यांनी सहभाग घेतला. आज पहाटेपासून सर्व केंद्रात लगबग दिसत होती. सकाळी सहा वाजता गुरुमाऊली प. पू अण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी केंद्रात गुरूपादुका पूजन आणि श्री. स्वामी समर्थ महाराजांचे षडशोपचार पूजन केले. भूपाळी आरती आणि नैवद्य आरतीची सेवा सर्व सेवेकऱ्यांनी रुजू केली.
या मंगलमय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दिंडोरी व त्र्यंबक मध्ये देशभरातून सेवेकरी विक्रमी संख्येने आले होते. अबालवृद्ध सेवेकरी शांततेत रांगेत येऊन श्री. स्वामी समर्थ महाराज मूर्तीला अभिषेक करून, पुष्प अर्पण करून चरणतीर्थ घेऊन समर्थाना विनंती करत होते, “महाराज आपणच माझे गुरु, माता, पिता, बंधू, सखा, गुरु, सद्गुरु, परम गुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्व आहात. माझा सांभाळ करा “. सर्वत्र महिला पुरुष सेवेकऱ्यांनी केंद्रात व आपापल्या घरी आज श्री स्वामी चरित्र सारामृत, तेजोनिधी या ग्रंथाची पारायण केले. आजचा सोहळा गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश, तेलंगना, तामिळनाडू, केरळ या राज्यात आणि नेपाळ, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई, ओमानमधील समर्थ केंद्रात सुद्धा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
दिंडोरीत गुरुमाऊली प. पू अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबक मध्ये चंद्रकांतदादा मोरे यांनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सेवामार्गाचे जगभरातील कार्य आणि भविष्यातील नियोजन याबाबत विस्तृत चर्चा करून समर्थसेवा घराघरात पोचवण्यासाठी आपण सर्वांनी अहोरात्र झटायचं आहे, असे आवाहनही केले.

हेही वाचा :

Back to top button