नाशिक : गोदावरीसह नंदिनी, वाघाडी, वालदेवी पूरपातळीचे रेखांकन | पुढारी

नाशिक : गोदावरीसह नंदिनी, वाघाडी, वालदेवी पूरपातळीचे रेखांकन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुराची पातळी आणि पूरनियंत्रण करता यावे तसेच पुरात होणारी जीवित आणि वित्तहानी टळावी, यादृष्टीने नाशिक महापालिका जलसंपदा विभागाच्या मदतीने गोदावरी नदीसह नंदिनी (नासर्डी), वाघाडी आणि वालदेवी या नद्यांच्या पूरपातळीचे रेखांकन (मार्किंग) करणार आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासन लवकरच जलसंपदा विभागाला पत्र देणार असून, जलसंपदा विभागाने रेखांकन केल्यानंतर त्याची तपासणी केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्रामार्फत करून घेतली जाणार आहे.

गंगापूर धरण समूह तसेच दारणा आणि मुकणे धरणातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जातो. यामुळे नदीपात्रासह त्याच्या आसपासच्या परिसरातही पुराच्या पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे हे पुराचे प्रभाव क्षेत्राची मार्किंग करण्याच्या दृष्टीने रेखांकन करण्यात येणार आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांची मंगळवारी (दि.12) प्राथमिक बैठक झाली. संततधारेमुळे गोदावरीला गेल्या तीन दिवसांपासून पूर आला आहे. गंगापूर धरण आणि नाशिक शहरातील गंगापूर गाव ते दसक-पंचक या 19 किमीच्या क्षेत्रातून पावसाचे पाणी नदीत मिसळल्यामुळे गोदावरीसह वाघाडी, नासर्डी आणि वालदेवी नदीच्या पाण्याची पातळी वाढते.

महापुरानंतर पूररेषांची आखणी
2008 मध्ये आलेल्या महापुरामुळे जलसंपदा विभागाने गोदावरी किनार्‍यालगत निळी आणि लाल पूररेषेची आखणी केली आहे. गेल्या 25 वर्षांत आलेल्या सर्वांत मोठ्या पुराच्या आधारावर निळी पूररेषा, तर 100 वर्षांत आलेल्या महापुराचा आधार घेत लाल पूररेषा निश्चित करण्यात आली आहे. निळी पूररेषा समुद्रसपाटीपासून 563 मीटर, तर लाल पूररेषा 567 मीटरवर आखण्यात आलेली आहे.

प्रत्येक फुटावर पातळीची नोंद
दरवर्षी पावसाळ्यात धरणातून होणारा विसर्ग आणि शहर परिसरातून तसेच नाल्यांमधून वाहून येणार्‍या पाण्यामुळे पुराच्या पातळीत मोठी वाढ होत असते. त्यामुळे पूर प्रभाव क्षेत्रात वाढ होत असून, त्यामुळे होणारी जीवित तसेच वित्तहानीला टाळता यावी, याकरिता उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलसंपदा विभागामार्फत नदीची सरासरी पातळी आणि निळी पूररेषा तसेच निळी आणि लाल पूररेषा यांच्या दरम्यान पूरपातळीचे रेखांकन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक फुटावर पूरपातळीची नोंद घेतली जाणार आहे, जेणेकरून पूरनियंत्रण आणि नियोजन करता येऊ शकते.

हेही वाचा :

Back to top button