नाशिक : मनपाची बससेवा महाराष्ट्रात अव्वलस्थानी ; आज वर्ष पूर्ण

सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news
सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका संलग्न नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक शहर बससेवेला शुक्रवारी (दि.8) एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात सिटीलिंकने एक कोटी 63 प्रवाशांचा टप्पा पूर्ण केला आहे. प्रतिदिन प्रवाशांची संख्या 70 हजार झाली आहे. तर उत्पन्नही 20 लाखांपर्यंत पोहोचले आहे. एका वर्षात बससेवेवर 71 कोटी 18 लाख खर्च आणि उत्पन्न मात्र 39 कोटी इतके झाल्याने 32 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, या स्थितीतही बसचे प्रतिकिमी उत्पन्न 45 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. हे उत्पन्न महाराष्ट्रात अव्वल ठरले आहे.

महापालिकेने 'ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट' तत्त्वावर खासगी ऑपरेटर्सद्वारे गेल्या वर्षी 8 जुलै रोजी सिटीलिंक बससेवा सुरू केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यात 200 बसेस सीएनजी तर, 50 बसेस डिझेलवर चालणार्‍या आहेत. पहिल्या टप्प्यात नऊ मार्गांवर 27 बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसेसची संख्या वाढविण्यात आली असून, आजमितीस 210 बसेस 46 मार्गांवर धावत आहेत. मनपाची बससेवा सुखकर आणि आरामदायी तसेच सुरक्षित असल्याने या बसेसला नाशिककरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिटीलिंकची सेवा केवळ नाशिक शहरापुरती मर्यादित न राहता आता सिन्नर, दिंडोरी, त्र्यंबक, गिरणारे अशा ग्रामीण भागातही सुरू करण्यात आली असून, त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी (दि. 8) या बससेवेला एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात सिटीबसने अडीच हजार प्रवाशांवरून सुरू केलेला प्रवास आता 70 हजारांपर्यंत पोहोचला आहे.

इंधन दरवाढीतही सिटीलिंक स्थिर
नाशिक महापालिकेने सिटीबसचा तोटा गृहीत धरत पहिल्या वर्षासाठी 60 कोटींची तरतूद धरली होती. प्रत्यक्षात सिटीबसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने सिटीबसचा तोटा राज्य परिवहन महामंडळाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षभरात सिटीलिंकवर 71 कोटी 18 लाखांचा खर्च आला आहे. त्या तुलनेत उत्पन्न 38 कोटी 84 लाख इतकेच आहे. सिटीलिंकला वर्षात 32 कोटी 44 लाख इतका तोटा सहन करावा लागत आहे. इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणावर होऊनही सिटीलिंकला मात्र कमी प्रमाणात झळ पोहोचली आहे.

डिजिटल तिकिटांवर 50 टक्के सूट

महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या सिटीलिंक शहर बससेवेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक महानगर परिवहन महामंडळातर्फे अ‍ॅपद्वारे तिकीट बुकिंग करणार्‍यांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिजिटल तिकिटांवरही सूट दिली जाणार आहे. तसेच 9 जुलैपासून वर्षभर ऑनलाइन तिकीट घेणार्‍या प्रवाशांना 5 टक्के सूट देण्यात येणार आहे.

वर्धापन दिनानिमित्त सेल्फी लिंक कॉन्टेस्ट स्पर्धा घेतली जाणार आहे. नाशिककरांना सेल्फी विथ सिटीलिंक घ्यावी लागणार असून, आय लव्ह सिटीलिंक या हॅशटॅक्स सोशल मीडिया हँडलवर अपलोड करावे लागेल. लकी ड्रॉच्या आधारे पाच स्पर्धकांची निवड केली जाईल. पाच स्पर्धकांना प्रत्येकी एक महिन्याचा ओपन एण्डेड पास बक्षीस दिले जाईल. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सिटीलिंकने अधिक प्रवास करत असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माहिती जागृती सप्ताह आयोजित केला जाणार आहे. सिटीलिंक बसचालक व वाहकांचा सत्कार केला जाणार आहे. सर्वाधिक पास वापरणारे सिटीलिंक प्रवासी व जास्त रक्कम असलेले टॉपचे पाच पास वापरकर्ते सिटीलिंक रायडर म्हणून निवडले जाणार आहेत. सुपर रायडर्सना एक महिन्याचा ओपन एण्डेड पास व स्टार बॅच दिला जाणार असून, चालक व वाहकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news