

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राजकारणात पदे मिळाल्यानंतर राजकीय नेत्यांचा सामान्यांशी, सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क तुटत असल्याचे अनेक अनुभव आहेत. मात्र, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार त्यांच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून मतदारांच्या सुख-दु:खात नेहमीच सहभागी होत असतात. डॉ. भारती पवार यांनी मंगळवारी (दि. 5) चांदवड तालुक्यात एका लग्नघरी हजेरी लावून चक्क पुर्या लाटल्या. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ज्या घरी लग्नसोहळा असतो तेव्हा हा लग्नसोहळा अपूर्व उत्साहात साजरा होत असतो. लग्नाची घाईगडबड, घरात आप्तस्वकीयांचा वावर, लग्नाच्या विविध प्रथेप्रमाणे सर्व गोष्टींची तयारीही होत असते आणि त्याचाच भाग म्हणून पुर्या लाटण्याचा कार्यक्रम असतो. चांदवड तालुक्यातील देणेवाडी गावचे कार्यकर्ते प्रगतिशील शेतकरी शिवाजी मोरे यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावता येणार नव्हती म्हणून ना. डॉ. भारती पवार यांनी लग्नघरी जाऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी योगायोगाने पुर्या लाटण्याचा कार्यक्रम सुरू होता.
महिला मोठ्या संख्येने जमल्या होत्या. त्यामुळे एक महिला म्हणून त्यांनाही राहवले नाही व डॉ. भारती पवार या पुर्या लाटण्यासाठी बसल्या. यामुळे महिलांच्या उत्साहात आणखी भर पडली. महिलांनी लग्नाची गाणी म्हटल्याने या सोहळ्याला उधाण आले होते. ना. डॉ. पवार एवढ्या मोठ्या पदावर जाऊनसुद्धा कुठलाही गर्व बडेजाव न मिरवता त्यांनी आपले पाय जमिनीवरच असल्याचे या प्रसंगातून दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया शिवाजी मोरे यांनी व्यक्त केली.