नाशिकहून हैदराबाद 22 जुलै, दिल्ली 4 ऑगस्टपासून विमानसेवा | पुढारी

नाशिकहून हैदराबाद 22 जुलै, दिल्ली 4 ऑगस्टपासून विमानसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. नाशिक-हैदराबाद विमानसेवा येत्या 22 जुलै, तर नाशिक-दिल्ली विमानसेवा 4 ऑगस्टपासून सुरळीत सुरू होणार असून, बुधवार (दि. 6)पासून ऑनलाइन तिकिट बुकिंग प्रणाली सुरू झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. विमानसेवा स्पाईस जेट कंपनीकडून पुरविण्यात येत आहे.

नाशिक-हैदराबाद आठवड्यातून सहा दिवस, तर नाशिक-दिल्ली विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. केंद्र शासनाच्या उड्डाण 2 योजनेअंतर्गत नाशिक शहर देशभरातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडले जावे, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाच वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले होते.

तत्कालीन मंत्री आणि नागरी वाहतूक प्रशासनाकडे गोडसे यांचा पाठपुरावा सुरू होता. विमानसेवेसाठी खासदार गोडसे यांनी दिल्लीत जाऊन नागरी हवाई मंत्रालयासमोर आंदोलनही केले होते. खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून तीन वर्षांपूर्वी नाशिक येथील ओझर विमानतळावरून प्रत्यक्ष विमानसेवेस प्रारंभ झाला होता. विमानसेवा बंद झाल्याने नाशिकसह धुळे, जळगाव आणि नगर येथील व्यापारी आणि उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, आता विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती स्पाईस जेट प्रशासनाने खा. गोडसे यांना कळविली आहे.

नाशिक-दिल्ली सेवा दररोज
नाशिक -हैदराबाद विमानसेवा शनिवार वगळता रोज आणि नाशिक-दिल्ली विमानसेवा रोजच उपलब्ध असणार आहे. हैदराबाद-नाशिक हे विमान हैदराबाद येथून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी निघणार असून, तेच विमान पुन्हा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ओझर येथून हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे. दिल्ली-नाशिक हे विमान सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी रोज दिल्ली येथून नाशिकसाठी उड्डाण घेईल आणि तेच विमान नाशिकहून पुन्हा दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी दिल्लीसाठी टेकऑफ होणार आहे. नाशिक-हैदराबाद या विमानात प्रवाशांची क्षमता 80, तर नाशिक-दिल्ली विमानात 189 प्रवाशांची आसन क्षमता आहे. प्रवास दोन तासांचा असणार आहे.

हेही वाचा :

Back to top button