सांगलीत सावकार कुटुंबाच्या घरावर छापा | पुढारी

सांगलीत सावकार कुटुंबाच्या घरावर छापा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महिन्याला 40 टक्के व्याज दराने पैसे देऊन घर करारपत्राद्वारे लिहून घेणार्‍या सांगलीतील खासगी सावकार धुमाळ कुटुंबाच्या घरावर बुधवारी शहर पोलिसांनी छापा टाकला. दोन तास घरझडती घेण्यात आली.

घर झडतीत लोकांना व्याजाने पैसे देण्यापूर्वी त्यांच्याकडून लिहून घेतलेले 122 कोरे धनादेश, 62 कोरे मुद्रांक (स्टॅम्प), करारपत्रांच्या दस्तऐवजाच्या आठ छायांकीत प्रती, विविध बँकाचे धनादेश, पासबुक, डेबीटकार्ड, उसनवार पावत्या, कर्ज दिलेल्या काही लोकांची आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, विजेचे बिल इत्यादी कागदपत्रेे जप्त करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.

सावकारी प्रकरणी अटकेत असलेल्या वैशाली रामचंद्र धुमाळ (वय 48), कोमल रामचंद्र धुमाळ (32), अमित रामचंद्र धुमाळ (27, तिघे रा. बाबर चाळ, मुख्य बसस्थानकामागे, सांगली) व अभिजित कोकाटे (31, माधवनगर, ता. मिरज) यांना बुधवारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने चौघांनाही दि. 8 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. यातील सोनम अभिजित कोकाटे (माधवनगर) ही अजूनही फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोमल धुमाळ ही महिला पोलिस आहे.

सांगलीवाडीतील अशोक पाटील यांनी फिर्याद दिली होती. त्यांनी संशयितांकडून सहा लाख 95 हजार रुपये महिना 40 टक्के व्याज दराने घेतले होतेे. आतापर्यंत पाटील यांनी व्याजासह 18 लाख 18 हजार रुपये रक्कम परत केली आहे. तरीही संशयितांनी पाटील यांना अजूनही सात लाख रुपये देणे लागते, असे म्हणून त्यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. या बदल्यात संशयितांनी पाटील यांचे राहते घर करारपत्राद्वारे लिहून घेतले होते. तसेच बँकेचे तारण म्हणून सहा धनादेश व चार मुद्रांक (स्टॅम्प) घेतले होते.

संशयितांनी वसुलीसाठी खूपच तगादा लावल्याने अखेर पाटील यांंनी जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांच्याकडे तक्रार केली. गेडाम यांनी याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले होते. त्यानुसार तातडीने गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली. महत्वाची कागदपत्रेही जप्त केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय कार्वेकर पुढील तपास करीत आहेत.

नागरिकांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे

सावकार धुमाळ कुटुंबाच्या घरझडतीत एवढ्या प्रमाणात धनादेश व मुद्रांक सापडल्याने त्यांच्याकडे अव्वाच्या-सव्वा व्याजदराने अनेकांनी पैसे घेतलेे असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या कुटुंबाविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button