नाशिक : पाचवर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, लोकांनी आरडाओरडा केल्याने ठोकली धूम | पुढारी

नाशिक : पाचवर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, लोकांनी आरडाओरडा केल्याने ठोकली धूम

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
सातपूरच्या अशोकनगर परिसरात बिबट्या आढळल्याची घटना ताजी असतानाच पंचवटीतील म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवरील जाधव-देशमुख वस्तीवर पाचवर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 5) रात्रीच्या सुमारास घडली. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर शेतकरी आणि शेतमजुरांच्या वस्त्यांची संख्या जास्त आहे. याच लिंक रोडवर जाधव-देशमुख व कडाळे वस्ती वास्तव्यास आहे. या ठिकाणी आडगाव येथील दीपक त्र्यंबक देशमुख (40) यांची शेती असल्याने कुटुंबासह ते येथे राहतात. मंगळवारी (दि. 5) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास दीपक देशमुख यांच्या पत्नी बाहेर ओट्यावर भांडे धुण्याचे काम करत होत्या. त्यांचा पाचवर्षीय मुलगा (साई) खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्याच्यावर हल्ला करत मक्याच्या शेतात ओढून नेले. यावेळी दीपक देशमुख यांची पत्नी व घरातील इतर लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने चिमुकल्या साईला सोडून धूम ठोकली.

नगर : गुरुजींची ‘शब्द’ परीक्षा! अर्ज माघारीला उरले तीन दिवस; सस्पेन्स कायम

यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे जाधव-देशमुख-कडाळे वस्तीवरील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार वनविभाग संबंधित भागात पिंजरा बसविणार आहे, असे वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

Back to top button